अथर्व सुदामे (Atharva Sudame) हा सोशल मीडियावर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडीओमुळे सध्या वाद सुरू झालाय. या व्हिडीओत तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो, यावेळी त्याला मूर्तीकार मुस्लिम असल्याचे कळते. यावेळी तो मूर्तीकार तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची असेल तर घ्या असं सांगतो. सुदामे याने त्याच मूर्तीकाराकडून मूर्ती घेतल्याचे दाखवले आहे. या व्हिडीओमुळे वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेनंतर सुदामे याने हा व्हिडीओ डिलिट केलाय. दरम्यान, आता अथर्व सुदामे याच्यासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
"अथर्व सुदामेने घाबरुन व्हिडीओ डिलिट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्वबाबत अनेक लोक विविध मते मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. पण, त्याने सातत्याने रिल्स तयार केलेत. स्पर्धेच्या युगात त्याने स्वत:चा एक मार्ग तयार केलाय. त्याचे कौतुक करायला पाहिजे. काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते. कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले, अशी चिंता वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढयासाठी मी अथर्व सोबत आहे. राज ठाकरे साहेबांनी अथर्वचे जाहीर कौतुक केले होते. तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडीओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया, असंही असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामे याने एक व्हिडीओ बनवला. यामध्ये त्याने एक मुस्लिम मूर्तीकार दाखवला आहे. अथर्व स्वत: भाविक म्हणून त्याच्याकडे जाऊन मूर्ती घेत असल्याचे दाखवले. यावेळी मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्यात अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला सांगतो. अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” असा संवाद या रीलच्या शेवटी आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया सुरू झाल्या. या व्हिडीओवर सुदामे याला ट्रोल करण्यात आले आहे. काही वेळानंतर सुदामे याने हा व्हिडीओ डिलिट केला.