रस्त्याचे डांबरीकरण अथवा मजबुतीकरण करा; शाळकरी मुलांसहीत नागरिकांचे जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:34 IST2025-07-01T17:32:10+5:302025-07-01T17:34:16+5:30

पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी साचली आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे

Asphalt or strengthen the road; Citizens including school children hold water immersion protest | रस्त्याचे डांबरीकरण अथवा मजबुतीकरण करा; शाळकरी मुलांसहीत नागरिकांचे जलसमाधी आंदोलन

रस्त्याचे डांबरीकरण अथवा मजबुतीकरण करा; शाळकरी मुलांसहीत नागरिकांचे जलसमाधी आंदोलन

मंचर: महाळुंगे पडवळ ते ठाकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण अथवा मजबुतीकरण व्हावे या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी बंधाऱ्यातील पाण्यात सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. शाळकरी मुले, महिला, पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ ते ठाकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण अथवा रस्त्याचे मजबुतीकरण करावे, या मागणीच्या पाठपुराव्यासाठी ठाकरवाडी येथील बंधाऱ्यात आज सकाळी 11 वाजता सामुहिक जलसमाधी आंदोलन देसावळा, ठाकरवाडी व बारवेमळ्यातील महिला, शाळकरी विद्यार्थी व हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी सुरू केले आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

देसावळा, ठाकरवाडी, बारवेमळा येथील ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरू केले आहे. महाळुंगे पडवळ, ठाकरवाडी मार्गे नारायणगाव हा जिल्हा मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सन २०२० मध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र सैदवाडी ते बारवेमळा फाटा दरम्यान एक किलोमीटर अंतरातील काम स्थानिक शेतकऱ्यांनी हरकत घेतल्याने रखडले आहे. पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी साचली आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे.

माजीमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मोबाईलहुन आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे घोडेगावचे शाखा अभियंता सम्राट भिसे, नायब तहसीलदार सचिन वाघ, ग्रामविकास अधिकारी वनवास वासनिक यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.

या रस्त्यावरून रोज अनेक गाड्यांची ये जा होते. महिला, वयोवृद्ध, शाळकरी मुले, शेतकरी ग्रामस्थ यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. येथे अनेक अपघात झाले आहेत. गुडघाभर खड्डे, पाणी यातून जावे लागते. शाळकरी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही पंधरा वर्षात मार्ग निघाला नाही त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. - बाबाजी चासकर अध्यक्ष हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान. 

Web Title: Asphalt or strengthen the road; Citizens including school children hold water immersion protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.