Video: भोंदू खरातची पुण्यात ‘माया’;चेक नाही, फक्त कॅश व्यवहार, मॉडेल कॉलनीत लेकीच्या नावे १.२० कोटींचा आलिशान फ्लॅट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:53 IST2026-04-01T13:48:03+5:302026-04-01T13:53:51+5:30
पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत मालमत्तेच्या व्यवहारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Video: भोंदू खरातची पुण्यात ‘माया’;चेक नाही, फक्त कॅश व्यवहार, मॉडेल कॉलनीत लेकीच्या नावे १.२० कोटींचा आलिशान फ्लॅट
पुणे - भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता केवळ फसवणुकी पुरते मर्यादित न राहता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळत असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची चौकशी वेगात सुरू केली असून, त्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनी परिसरात आलिशान ३ बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे. २४ रत्नम या प्रीमियम सोसायटीतील सातव्या मजल्यावर असलेला हा सुमारे १०५५ चौरस फुटांचा फ्लॅट १३ सप्टेंबर २०२३ रोजी खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या व्यवहारातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित बिल्डरला तब्बल १ कोटी २० लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचा संशय आहे. सेल डीडमध्ये चेक किंवा बँक व्यवहाराचा कोणताही उल्लेख नसल्याने या व्यवहारावर संशयाचे सावट गडद झाले आहे. या आर्थिक व्यवहाराबाबत पोलीस तपास सुरु आहे.
कोरेगाव पार्कमधील १ ५ ० कोटींची मालमत्ता संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणात अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे हेही तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील मोठ्या मालमत्ता व्यवहारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तपासात उघडकीस आले की, कोरेगाव पार्क परिसरात सुमारे ४९ गुंठे जागेवर १८ रो-हाऊस पोफळे यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.
या मालमत्तेची बाजारातील किंमत सुमारे १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अधिकृत कागदपत्रांमध्ये ही मालमत्ता २ ०२ ४ मध्ये केवळ १९ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. बाजारभाव आणि दाखवलेल्या किंमतीतील मोठी तफावत लक्षात घेता हा व्यवहार संशयास्पद मानला जात आहे. विशेष म्हणजे, या परिसरात देशातील अनेक नामांकित उद्योगपतींचे बंगले असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान, प्रकाश पोफळे यांच्याकडे एवढा मोठा निधी आला कुठून? या व्यवहारांमध्ये अशोक खरातचा पैसा गुंतलेला आहे का? किंवा या मागे कोणते राजकीय आणि आर्थिक नेटवर्क कार्यरत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.