Pandharpur Ashadhi Wari 2026: संभ्रम अखेर दूर..! आषाढी वारीत ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम यंदाही भवानी पेठेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:22 IST2026-05-14T10:21:45+5:302026-05-14T10:22:12+5:30

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026 Schedule: वारकऱ्यांची वाढती संख्या, अपुरी जागा आणि भाविकांना होणाऱ्या गैरसोयीमुळे पालखी मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवण्याची चर्चा रंगली होती.

ashadhi wari 2026 Confusion finally cleared! Dnyaneshwar Mauli will stay at Bhavani Peth during Ashadhi this year too | Pandharpur Ashadhi Wari 2026: संभ्रम अखेर दूर..! आषाढी वारीत ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम यंदाही भवानी पेठेतच

Pandharpur Ashadhi Wari 2026: संभ्रम अखेर दूर..! आषाढी वारीत ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम यंदाही भवानी पेठेतच

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026 Schedule: आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांची लेखी हमी दिल्यानंतर यंदाही पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरातच होणार असल्याचे संस्थान कमिटीने स्पष्ट केले.

वारकऱ्यांची वाढती संख्या, अपुरी जागा आणि भाविकांना होणाऱ्या गैरसोयीमुळे पालखी मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवण्याची चर्चा रंगली होती. मात्र, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांना दिलेल्या लेखी पत्रानंतर हा पेच सुटला.

२५ मे २०२६ रोजी दिलेल्या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी शेजारील तीन खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले आहे. तसेच, मंदिरासमोरील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्याचे काम सुरू असून, भाविकांच्या सोयीसाठी नवीन रस्ता निर्मिती आणि अडथळा ठरणारे विद्युत खांब हलविण्याची कार्यवाहीही सुरू आहे.

पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम करत असून, पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

२०१० पासून सुरू होती स्थलांतराची चर्चा

भवानी पेठेतील अपुरी जागा, दर्शन रांगेतील ऊन-पावसाचा त्रास आणि पार्किंग सुविधांचा अभाव यामुळे सन २०१० पासून पालखी मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवण्याची मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर संस्थान कमिटीने १३ एप्रिल २०२६ रोजी नियोजित बैठकही रद्द केली होती. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासणे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. पुणे महापालिकेने यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असून ३१ मेपर्यंत आवश्यक जागा ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे. 

पंढरपूर आषाढी वारी २०२६ रिंगण सोहळ्याचे वेळापत्रक

  • पहिले उभे रिंगण: १६ जुलै (गुरुवार), चांदोबाचा लिंब येथे पार पडेल.

  • पहिले गोल रिंगण: २० जुलै (सोमवार), पुरंदवडे येथे पार पडेल.

  • दुसरे गोल रिंगण: २१ जुलै (मंगळवार), खुडूसफाटा येथे पार पडेल.

  • तिसरे गोल रिंगण: २२ जुलै (बुधवार), ठाकूरबुवाची समाधी येथे पार पडेल.

  • दुसरे उभे रिंगण: २३ जुलै (गुरुवार), बाजीरावची विहीर येथे पार पडेल.

  • चौथे गोल रिंगण: २३ जुलै (गुरुवार), बाजीरावची विहीर येथे पार पडेल.

  • तिसरे उभे रिंगण: २४ जुलै (शुक्रवार), वाखरी जवळील पादुकांजवळ पार पडेल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६: पंढरपूर आषाढी वारी रात्रीचा मुक्काम

  • १६ जुलै: तरडगाव.

  • १७ जुलै: फलटण.

  • १८ जुलै: बरड.

  • १९ जुलै: नातेपुते.

  • २० जुलै: माळशिरस.

  • २१ जुलै: वेळापूर.

  • २२ जुलै: भंडीशेगाव.

  • २३ जुलै: वाखरी.

  • २४ ते २८ जुलै: पंढरपूर.

८ जुलैला आळंदीतून प्रस्थान

यंदाचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. ९ आणि १० जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेत होणार आहे. प्रशासनाच्या हमीपत्रावर बुधवारी (दि. १३) झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, ॲड. रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी आणि व्यवस्थापक माउली वीर उपस्थित होते.

Web Title : आषाढ़ी वारी: संत ज्ञानेश्वर पालखी भवानी पेठ में ही रुकेगी

Web Summary : संत ज्ञानेश्वर महाराज की आषाढ़ी वारी पालखी के पड़ाव को लेकर भ्रम दूर हुआ। यह भवानी पेठ के विट्ठल मंदिर में ही रहेगा। प्रशासन ने आवश्यक व्यवस्था सुनिश्चित की, जिससे जगह की चिंता दूर हो गई। पालखी 8 जुलाई को आलंदी से रवाना होगी।

Web Title : Ashadhi Wari: Sant Dnyaneshwar Palkhi to Stay in Bhawani Peth

Web Summary : Confusion ends regarding Sant Dnyaneshwar Maharaj's Ashadhi Wari Palkhi stay. It will remain at Bhawani Peth's Vitthal Mandir. Administration ensured necessary arrangements, resolving space concerns. The Palkhi departs Alandi on July 8.