मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये वाद; एका तरुणाचा दगडाने ठेचून खून, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:23 IST2026-05-08T10:22:07+5:302026-05-08T10:23:22+5:30
मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, संतापाच्या भरात संशयिताने दगडाने ठेचून एकाचा खून केला

मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये वाद; एका तरुणाचा दगडाने ठेचून खून, पुण्यातील धक्कादायक घटना
वानवडी : घोरपडी परिसरातील बी.टी. कवडे रस्त्यावरील भाग्यश्री नगर येथे मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री नगर येथील मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती संकलित केली. मृत व्यक्तीची ओळख लोकेश ठेंबरे (वय ३०, रा. घोरपडी, पुणे, मूळ रा. नागपूर) अशी पटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश आणि अल्पवयीन संशयित हे दोघे घटनास्थळी बसून मद्यपान करत होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात संशयिताने दगडाने लोकेशच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या लोकेशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.