पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी आता ‘ॲप’चा वापर; माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:41 IST2026-03-24T12:41:11+5:302026-03-24T12:41:27+5:30
सध्या शहरातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत या अवैध व्यवसायाचे जाळे पसरले आहे.

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी आता ‘ॲप’चा वापर; माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार
पुणे : शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागरिकांच्या सहभागावर आधारित एक विशेष ‘ॲप’ विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या ॲपची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांकडून दिली जाणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही माहिती देणाऱ्याची ओळख समजणार नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या शहरातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत या अवैध व्यवसायाचे जाळे पसरले आहे. आर्थिक परिस्थितीनुसार विविध प्रकारचे अमली पदार्थ वापरले जात असल्याचे चित्र आहे. काही गुन्हेगारांनी तर औद्योगिक वसाहतींमध्येच ड्रग्ज तयार करण्याचे कारखाने उभारल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून हे ॲप तयार केले जात आहे. वाहतूक नियमभंगाविरोधात वापरल्या जाणाऱ्या ‘पीटीपी’ ॲपप्रमाणेच, या ॲपवर नागरिकांना अमली पदार्थांच्या विक्रीसंबंधित फोटो, व्हिडीओ आणि लोकेशन अपलोड करता येणार आहे. ही माहिती थेट पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात पोहोचेल आणि त्यानुसार तातडीने कारवाई केली जाईल. याबाबत सहपोलिस आयुक्त रंजकुमार शर्मा यांनी सांगितले की, पोलिसिंगमध्ये नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा गोपनीयतेच्या भीतीमुळे किंवा गुन्हेगारांकडून धोका निर्माण होईल या चिंतेमुळे नागरिक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. मात्र, हे ॲप नागरिक आणि पोलिस यांच्यात सुरक्षित दुवा म्हणून काम करेल. सुरुवातीला या ॲपचे नियंत्रण गुन्हे शाखेकडे प्रायोगिक तत्त्वावर देण्यात येणार आहे.
पोलिस ठाणे स्तरावर अमली पदार्थ विरोधी पथक...
शहरात गुन्हे शाखेची दोन अमली पदार्थ विरोधी पथके कार्यरत आहेत. मात्र, शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता, आता पोलिस ठाणे स्तरावरदेखील अमली पदार्थ विरोधी पथक कार्यरत करण्याबाबत वरिष्ठ अधिकारी विचाराधीन आहेत. लवकरच ही पथके सुरू होणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरुवातील शहरातील १०-१२ पोलिस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केले जाणार असून, त्यानंतर काही दिवसांनी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये हे पथक स्थापन केले जाणार आहे.
नगरसेवकांची पोलिस घेणार मदत...
अमली पदार्थ विरोधी मोहिमेत पोलिस स्थानिक नगरसेवकांची मदत घेणार आहेत. नुकतीच परिमंडळ १ येथे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यावेळी नगरसेवकांना पोलिस आयुक्तांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी मोहिमेला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.