आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:50 IST2025-10-03T10:49:34+5:302025-10-03T10:50:07+5:30
जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले

आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस
पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह दोघांविरोधात खंडणी तसेच एकाच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले. तसेच, तक्रारदाराकडे जमिनीच्या नियोजित विकसनासाठी एक कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बंडू आदेकर, मनोज वर्देकर यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे, त्यांच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी तक्रारदाराच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन पाच कोटी ४० लाख रुपये भाडे स्वरूपात उकळले. जमिनीच्या नियोजित विकसनासाठी आरोपींनी एक कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे.
आंदेकर टोळी गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांना धमकावून दरमहा हप्ता घेत होती. या टोळीने धमकावून खंडणी उकळली असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर समर्थ पोलिस ठाण्यात तक्रारदाराने या टोळीविरोधात खंडणी, तसेच जमिनीची बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीने धमकावून अनेकांकडून खंडणी उकळल्याचा संशय आहे. आंदेकरच्या घरातून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आली.
नाना पेठेतील टोळीयुद्ध तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. या प्रकरणात आंदेकरसह १५ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने आंदेकरसह साथीदारांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.