पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 11:29 IST2025-05-24T11:28:59+5:302025-05-24T11:29:37+5:30

तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून किडनी रॅकेटप्रकरणी लवकरच गुन्हे शाखेकडून त्याचा ताबा घेतला जाणार

Another act of Dr. Ajay Taware in the Porsche case; Co-accused in Ruby Hall's kidney racket | पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. तावरेला या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला या प्रकरणात जामीन मिळालेला नसताना आता किडनी रॅकेटप्रकरणी लवकरच गुन्हे शाखेकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे. याप्रकरणी, कोरेगा पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटप्रकरणी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीने त्याचवेळी डॉ. तावरे याचा सहभाग निश्चित केला होता. तसे अहवालातदेखील नमूद करण्यात आले होते. मात्र, गुन्हा दाखल होताना तो रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय तज्ज्ञ, दलाल, रुग्ण आणि दात्यावर दाखल झाला. पोलिस तपासात अहवालातील तावरे बाबतची बाब समोर आल्याने पोलिस आयुक्तांनी त्याला या प्रकरणातदेखील सहआरोपी करण्यात यावे, असे आदेश दिले.

रॅकेटमध्ये होते तब्बल पंधरा आरोपी

किडनी रॅकेटप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता (डोनर) सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन (उपसंचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ. भुपत भाटी, डॉ. हिमेश गांधी आणि समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती. त्यात आता डॉ. तावरेची भर पडली आहे.

असा प्रकार आला उजेडात...

यादरम्यान संबंधित रुग्ण साळुंके याची खरी पत्नीही क्लिनिकमध्ये त्याची विचारपूस करण्यासाठी येत होती. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिने तिच्या बहिणीला एजंट रवि भाऊने पैसे दिले का? अशी विचारणा केली. त्यावर रवि भाऊने केवळ चार लाख रुपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. परंतु, ठरल्याप्रमाणे पंधरा लाख रुपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाइकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यानंतर खरे प्रकरण उघडकीस आले.

डॉ. तावरे मुख्य भूमिकेत

किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. अजय तावरे हा एफआयआरमधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान, जुन्या गुन्ह्यांचे निर्गतीकरण करताना पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल वाचण्यात आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला. तेव्हा डॉ. तावरे याचीच प्रत्यारोपणात मुख्य भूमिका असल्याचे उघड झाले. तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. रिजनल ॲथोरायझेशन कमिटीचा तावरे त्यावेळी अध्यक्ष होता. आठ सदस्यांची समिती तावरेच्या नियंत्रणाखालीच काम करत होती. जेव्हा किडनी रॅकेट राज्यात गाजले तेव्हा ससूनच्या या समितीबाबतदेखील संशय निर्माण झाला होता. तेव्हा राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली दहा लोकांची समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या चौकशीत तावरेचा हा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Another act of Dr. Ajay Taware in the Porsche case; Co-accused in Ruby Hall's kidney racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.