चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले
By नितीश गोवंडे | Updated: February 15, 2025 15:32 IST2025-02-15T15:31:20+5:302025-02-15T15:32:25+5:30
जेवण करून वेअरहाऊसकडे परतत असताना दोघांमध्ये बिल देण्यावरून वाद झाला, तेव्हा एकाने दुसऱ्याच्या गालात चापट मारली होती

चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले
पुणे : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलावरून दोन कंटेनर चालकांमध्ये वाद झाला. यातून एकाने दुसऱ्याच्या गालावर चापट मारली. याचा राग आल्याने एका कंटनेर चालकाने दुसऱ्या कंटेनर चालकाच्या अंगावर कंटेनर घालत ठार मारले. याप्रकरणी तिसऱ्या कंटनेर चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून वाघोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर बालाजी देवराये (३५, रा. नांदेड) असे मृताचे नाव आहे. राम दत्ता पुरी (२५, रा. शिरूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, रामचंद्र शिवराम पोले (४४, रा. चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मृत हे दोघेही संतोष पांचुदकर यांच्याकडे असलेल्या कंटेनरवर चालक म्हणून काम करायचे. गुरूवारी (दि. १३) परमेश्वर देवराये आणि राम पुरी हे दोघेही त्यांच्याकडील कंटेनर घेऊन गणेश वेअरहाऊस येथे माल उतरवण्यासाठी आले होते. रात्री पर्यंत कंटेनरमधील माल न उतरवला गेल्याने साडेआठच्या सुमारास परमेश्वर, राम आणि रामचंद्र पोले हे तिघेही पुणे-नगर रोडलगतच्या हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले. जेवण करून वेअरहाऊसकडे परतत असताना, परमेश्वर आणि राम यांच्यात बिल देण्यावरून वाद झाला. यातून परमेश्वर यांनी रामच्या गालावर चापट मारली. याचा राग आल्याने, ‘तुला आता मी जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत रामने त्याच्या ताब्यातील कंटेनर (एमएच १२ डब्ल्यू एक्स ८३०७) परमेश्वर यांच्या अंगावर घातला. यात परमेश्वर यांचा मृत्यू झाला. यावेळी राम पुरी याने तेथे उभ्या असलेल्या अन्य वाहनांना देखील धडक दिली. त्यानंतर तो कंटेनर घेऊन पळून गेला. लोकांनी त्याला पाठलाग करून पकडल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात नेत, त्याच्याविरोधात रामचंद्र यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी रामला अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ केदार करत आहेत.