खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 17:25 IST2025-07-13T17:25:14+5:302025-07-13T17:25:50+5:30
साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले
पुणे - साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, जि. नाशिक) असून, धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन साळवे अवघ्या १८ दिवसांपूर्वी मामाकडे राहण्यासाठी आंबेगाव पठार, पुणे येथे आला होता. तो एका सलूनमध्ये नोकरी करत होता. शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास तो पान खाण्यासाठी साई सिध्दी चौकातील टपरीवर गेला असताना आरोपी धैर्यशील मोरे तिथे सिगारेट पित उभा होता. धैर्यशील मोरे याने आर्यन साळवेने ‘पाहिलं का?’ असा जाब विचारत वाद घातला. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
या दरम्यान, धैर्यशील मोरे याने धारदार कोयत्याने आर्यनवर सपासप वार केले. हल्ल्याचा प्रतिकार करताना आर्यनची बोटे तुटली. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षक प्रियंका निकम या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.