... अन् त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली,मन सुन्नं झालं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 19:51 IST2021-04-03T19:44:22+5:302021-04-03T19:51:01+5:30
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...!

... अन् त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली,मन सुन्नं झालं!
पांडुरंग मरगजे -
धनकवडी : चारचाकी गाडीतून पुण्याकडे निघालं होतं कुटुंब. वडील गाडी चालवत होते. तर आईसह तीन मुलींपैकी कुणी कल्पनाही केली नसेल की हा त्यांचा प्रवास अखेरचा ठरणार आहे. पानशेतकडून पुण्याकडे येणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् गाडी खडकवासला धरणात कोसळली. पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पत्नीसह तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मन सुन्नं करणारी ही घटना शुक्रवारी (दि. २ एप्रिल) दुपारी घडली. अन् विठ्ठल भिकुले यांच्या कुटुंबासह धनकवडी परिसरात एकच शोककळा पसरली.
प्राजक्ता भिकुलेची बाल मैत्रीण असलेली पूजा कोकाटे म्हणाली, " माझी मैत्रीण ही प्राजक्ताच्या फुलासारखीच सतत हसणारी होती आणि तिच्या दोन बहिणी प्रणिता आणि वैदेही म्हणजे जणु चंपा आणि चाफेकळीच होत्या. परंतु काल त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली, मन हेलावून गेले. अश्रू अनावर झाले.
प्राजक्ता माझ्या खूप जवळची मैत्रिण होती. गणपती, नवरात्र, दिवाळी असे सारे सण आम्ही एकत्रच साजरे करायचो.एकवेळ रक्ताचे नाते जवळचे नसेल इतके आमच्या मैत्रीचे नाते खूप जवळचे होते. कधी विचारसुद्धा केला नव्हता, असे काही घडेल म्हणून ! कॉलेजला जायला लागल्यापासून दोघींची मैत्री अधिक घट्ट आणि सोबत वाढली होती. सुमारे १९ आमची मैत्री होती. मोठीचा स्वभाव खूप शांत, दुसरी थोडी चंचल आणि तिसरी खूपच मस्तीखोर! डोळयासमोर अजूनही तिघींचे चेहेरे येतात. प्राजक्ताला वाणिज्य शाखेतील पदवी घेऊन स्वतः च्या पायावर उभं राहायचं होतं, तिला छानसा व्यवसायही करायचा होता. आई वडिलांचे नाव मोठं करायचा होतं, त्यांना आधार द्यायचा होता. पण आता सारं काही अर्धवट राहिलं. या अपघातात सुदैवाने प्राजक्ताचे वडील बचावले. परंतु त्यांच्यावर दु:खाचा पहाड कोसळला आहे.
-------------
अजूनही विश्वास बसत नाही की ही घटना खरी आहे. पण दुर्दैवाने ती खरी आहे. अल्पनाताई व आम्ही लहानपणी एकाच चाळीमध्ये राहायचो. तिचा स्वभाव सगळ्यांशी मनमिळाऊ व मोकळ्या मनाने ती सर्वांशी वागायची. लहानपणापासून कष्ट करून ती मोठी झाली. घरची व स्वतःची जबाबदारी तिने घेतली. तिच्या ह्या अशा चांगल्या स्वभावामुळे ती सर्वांच्या कौतुकास पात्र होती. मयूर मसुरकर, धनकवडी.