मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:33 IST2025-05-22T10:32:32+5:302025-05-22T10:33:04+5:30

हे प्रकरण केवळ कौटुंबिक नसून सामाजिक भान विसरणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा आहे

An incident that casts a shadow over humanity! Vaishnavi must get justice; Nationalist's firm stand | मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

किरण शिंदे 

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कठोर भूमिका घेत, राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या घरात घडलेल्या संतापजनक प्रकारावर पक्षाने तीव्र निषेध नोंदवत, त्यांच्यावर असलेली सर्व पदे तात्काळ रद्द केली आहेत.

या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, "राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या घरात घडलेली घटना ही संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद असून, ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. पक्ष अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध करतो."

वैष्णवी हागवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका

पक्षाने याप्रकरणी स्पष्ट भूमिका घेत वैष्णवी हगवणे या पीडित बहिणीला न्याय मिळावा, अशी ठाम मागणी केली आहे. "हे प्रकरण केवळ कौटुंबिक नसून सामाजिक भान विसरणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा आहे. त्यामुळे आम्ही संबंधित यंत्रणांकडे मागणी करतो की, पीडितेला त्वरित न्याय मिळावा," असे सुरज चव्हाण यांनी नमूद केले.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, समाजातील सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कायद्याने योग्य ती कारवाई होईल आणि अन्याय करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे यांच्यासह दिर आणि नणंदवर गुन्हा दाखल आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे तर राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर फरार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असल्याने राजेंद्र हगवणे यांना अटक केली जात नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे.

Web Title: An incident that casts a shadow over humanity! Vaishnavi must get justice; Nationalist's firm stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.