उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप; यकृत प्रत्यारोपणातील दाम्पत्याच्या मृत्यू; सह्याद्री रुग्णालयाला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:52 IST2025-08-25T12:52:30+5:302025-08-25T12:52:39+5:30
उपचारासाठी २० लाखांचा खर्च झाला असून, त्यासाठी त्यांनी सदनिका गहाण ठेवली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलगा व मुलगी पोरकी झाल्याची हृदयद्रावक माहिती नातेवाइकांनी दिली.

उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप; यकृत प्रत्यारोपणातील दाम्पत्याच्या मृत्यू; सह्याद्री रुग्णालयाला नोटीस
पुणे: यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांत पतीचा व त्यास स्वतःचे यकृत देणाऱ्या पत्नीचा सहा दिवसांनी मृत्यू झाल्याप्रकरणी डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयाला आरोग्य उपसंचालक कार्यालयाने नोटीस पाठवली आहे. प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी या प्रकरणाबाबत रविवारी (दि. २४) नोटीस पाठवून रुग्णालयाकडून खुलासा मागविला आहे.
खासगी रुग्णालयांत करण्यात येणाऱ्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. खासगी रुग्णालयाला पाच वर्षांसाठी प्रत्यारोपण परवाना दिला जातो. त्यानुसार या प्रकरणाची दखल घेत आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सह्याद्री रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे.
केवळ सात दिवसांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सह्याद्री रुग्णालयाकडून शस्त्रक्रिया करताना व नंतरच्या उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हडपसर येथील रहिवासी बापू बाळकृष्ण कोमकर (वय ४८) यांचा मृत्यू दि. १५ ऑगस्ट रोजी, तर त्यांची पत्नी कामिनी (वय ४२) यांचा मृत्यू शुक्रवारी (दि. २२) झाला. त्यांचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २० लाख रुपयांचा खर्च झाला असून, त्यासाठी त्यांनी सदनिका गहाण ठेवली आहे. बापू कोमकर हे कुटुंबात एकमेव कमावते असल्याची व आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलगा व मुलगी पोरकी झाल्याची हृदयद्रावक माहिती नातेवाइकांनी दिली.
सह्याद्री हॉस्पिटलने लिव्हर प्रत्यारोपणप्रकरणी उपसंचालकांकडून प्राप्त नोटिशीची नोंद घेतली असून चौकशीसाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कठीणप्रसंगी आम्ही संबंधित कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. उपसंचालकांकडून प्राप्त नोटिशीची आम्ही नोंद घेतली असून चौकशीस पूर्ण सहकार्य करत आहोत. या प्रकरणाचा सखोल आणि पारदर्शक आढावा घेता यावा, यासाठी आवश्यक ती सर्व माहिती व मदत आम्ही प्रशासनाला उपलब्ध करून देऊ. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.