चारही खोल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात; सुखसागर नगर परिसरात चेंबरचे पाणी घरात, महापालिकेने लक्ष देण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:21 IST2025-10-31T10:21:05+5:302025-10-31T10:21:31+5:30
महापालिकेकडून याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, मोठ्या व्यासाची लाईन टाकण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल

चारही खोल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात; सुखसागर नगर परिसरात चेंबरचे पाणी घरात, महापालिकेने लक्ष देण्याची गरज
कात्रज : सुखसागर नगर परिसरातील सर्व्हे क्रमांक १८, आजूबाजूच्या इमारती व घरांमधील नागरिकांना रस्त्यावरील चेंबर तुंबल्यामुळे घाण पाणी घरामध्ये येत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी असणारी रस्त्यावरील ड्रेनेज लाईन ही अतिशय जुनी आहे. त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ती टाकण्यात आली होती. परंतु आत्ताची लोकसंख्या प्रचंड वाढली असून त्यावर ताण येत असल्याने चेंबर तुंबते व त्याचे घाण पाणी, कचरा घरामध्ये येते. त्यामुळे महापालिकेकडून याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. मोठ्या व्यासाची लाईन टाकण्यात यावी. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात ड्रेनेज विभागाच्या जगदीश खानोरे यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
मागील चार-पाच वर्षांपासून रस्त्यावरील चेंबर तुंबल्याने चेंबरचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी थेट आमच्या घरामध्ये येत आहे. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. आमच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून आरोग्य धोक्यात आले आहे. घरामध्ये असणाऱ्या चारही खोल्या या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भरून जातात - मुन्ना विश्वकर्मा, रहिवासी