अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:30 IST2025-12-04T10:29:57+5:302025-12-04T10:30:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर पूर्वचे अध्यक्ष सुनील टिंगरे तर पश्चिमचे अध्यक्ष म्हणून सुभाष जगताप यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पूर्व शहर विभागाची जम्बाे कार्यकारिणी शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ३९ उपाध्यक्ष, २२ सरचिटणीस, १७ शहर चिटणीस, २० संघटक सचिवांसह इतर पदांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर पूर्वचे अध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे तर पश्चिमचे अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पूर्व विभागात पुणे शहरातील वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर, कसबा हे विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. टिंगरे यांनी त्यांची पूर्व शहराची जम्बाे कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जम्बाे कार्यकारिणी जाहीर करून पक्षातील नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. या कार्यकारिणीमध्ये रूपाली पाटील-ठाेंबरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी आमदार महादेव बाबर यांच्याकडे प्रदेश प्रतिनिधी म्हणून जबाबदारी साेपवली आहे. संभाजी ब्रिगेडला रामराम ठाेकून पक्षात प्रवेश करणारे विकास पासलकर यांची प्रवक्तेपदी तर राकेश कामठे यांची शहर समन्वयक, माजी नगरसेवक बाळासाहेब बाेडके, बाळासाहेब काेद्रे, नारायण लाेणकर आणि विजय ढेरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची नियुक्ती केली आहे. तर कार्यकारिणीमध्ये ३९ जणांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी २२ जणांकडे, शहर चिटणीस पदाची जबाबदारी १७ जणांकडे, संघटक सचिव पदाची जबाबदारी २० जणांकडे जबाबदारी साेपविली आहे. हसीना ईनामदार यांची महिला सेलच्या अध्यक्षपदी, युवकच्या अध्यक्षपदी आमदार चेतन तुपे यांचे पुत्र इशान तुपे, युवती सेलच्या अध्यक्षपदी लावण्या शिंदे, विद्यार्थी सेलच्या अध्यक्षपदी विशाल माेरे, बाळा चव्हाण यांची सामाजिक न्याय सेल, अर्जुन गरूड यांची ओबीसी सेल, समीर शेख यांची अल्पसंख्याक सेल, प्रदीप चाेपडे यांची सेवादल सेल, विठ्ठल काेथरे यांची अनुसूचित जमाती सेल, विजय जाधव यांची भटक्या विमुक्त जाती जमाती सेल, राजेंद्र देशमुख यांची क्रीडा सेल, अशाेक जाधव यांची क्रीडा सेल, प्रदीप चांधेरे यांची लीगल सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.