जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:17 IST2025-11-04T20:17:42+5:302025-11-04T20:17:52+5:30
आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे

जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे
पुणे: अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट' (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या साथीदारांनी या ठिकाणावरून काही संशयित पुस्तके-प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे गोळा करून काळेपडळ येथील एका मदरशाच्या मोकळ्या जागेत जाळल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी जुबेरच्या पोलिस कोठडीत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जुबेर इलियास हंगरगेकर (वय ३७, रा. कोंढवा) याला 'एटीएस'ने २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याला पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी दुपारी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे व तपास अधिकारी सहायक आयुक्त अनिल शेवाळ यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
जुबेर हा कोंढव्यातील कौसरबाग येथे कुराण, हदीस, खिलाफत या विषयांवर आक्रमक उपदेश (दर्स) द्यायचा. त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन 'एटीएस'च्या तपास पथकाने काळेपडळ येथील मदरशाच्या मोकळ्या जागेचा पंचनामा करत काही अर्धवट जळालेली कागदपत्रे ताब्यात घेतली. या ठिकाणच्या 'सीसीटीव्ही' चित्रीकरणामध्येही जुबेरचा साथीदार एका रिक्षातून येऊन कागदपत्रे जाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत, सात साक्षीदारांकडे तपास करण्यात आला आहे. याशिवाय जुबेर व त्याचे साथीदार कौसरबागेतील एका इमारतीच्या तळघरातील मदरशात (मकतब) एकत्रित यायचे. तपास अधिकाऱ्यांनी या ठिकाणचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. जुबेरच्या मोबाइल व लॅपटॉपमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या डेटाचे विश्लेषण सुरू आहे. त्यातून मिळालेल्या पीडीएफ फाइल व चॅटिंगमध्ये काही सांकेतिक भाषेचा व शब्दांचा वापर असल्याची शक्यता आहे. आरोपीच्या जवळच्या साथीदाराच्या घरातून २ लाख ३५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून, ही रक्कम कोणाकडे, कशासाठी जाणार होती? आरोपीच्या साथीदारांनी कोणती पुस्तके, कागदपत्रे जाळली? आरोपीने कोंढव्यातील मशिदीत 'क्यूआर कोड' लावून स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले. या खात्यांचे 'फॉरेन्सिक ऑडिट' सुरू आहे. आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे.
आरोपीच्या 'कॉन्टॅक्ट लिस्ट'मध्ये पाच जण परदेशातील आरोपी जुबेर हंगरगेकरचा जुना मोबाइल त्याच्या साथीदाराच्या घरातून जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत व ओमानमधील पाच व्यक्तींचे संपर्क क्रमांक आहेत; तर तो वापरत असलेल्या मोबाइलमध्ये ओमान व सौदी अरेबियातील पाच व्यक्तींचे संपर्क क्रमांक आढळून आले आहेत. त्याबाबत चौकशी केली असता, आरोपी जाणूनबुजून माहिती देत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
जुबेरचे काही साथीदार 'सिमी'चे जुने सदस्य
जुबेरच्या जवळचे साथीदार असलेल्या १८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण केंद्र सरकारने बंदी घातलेल्या 'सिमी' (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या संघटनेचे जुने सदस्य असून, काही जणांविरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हे दाखल आहेत. त्याचा एक साथीदार शिक्षा भोगून आला असून, अन्य काही साथीदार तपास यंत्रणेच्या रेकॉर्डवरील संशयित आहेत.
झोप मिळत नसल्याची जुबेरची तक्रार
न्यायालयाने पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का, अशी विचारणा जुबेरला केली. त्यावर, तपास अधिकारी माझ्याकडे सतत तपास करत असल्याने मला पूर्णवेळ झोप मिळत नाही; त्यामुळे माझ्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे, अशी तक्रार जुबेरने केली. त्यावर आरोपीकडे तपास करताना त्याला आवश्यक असलेली झोप मिळू द्या, असे निर्देश न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले.