दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या कीर्तनकारावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई? पोलीस आयुक्तांसमोरच मांडली व्यथा

By किरण शिंदे | Updated: February 2, 2026 16:24 IST2026-02-02T16:24:45+5:302026-02-02T16:24:56+5:30

मी दारू पितो, असे कोणी सांगितले तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण पोलिसांनी चुकीची कारवाई करू नये

Action taken against a Kirtankara who never touches alcohol for drunk driving? Grief expressed before the Police Commissioner | दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या कीर्तनकारावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई? पोलीस आयुक्तांसमोरच मांडली व्यथा

दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या कीर्तनकारावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई? पोलीस आयुक्तांसमोरच मांडली व्यथा

पुणे: मी आयुष्यात कधीच दारू पाहिली नाही… कीर्तन हाच माझा श्वास आहे, माझी मद्याची चाचणी कधीच पॉझिटिव्ह येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात फोन करून चौकशी करा. मी दारू पितो, असे कोणी सांगितले तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण पोलिसांनी चुकीची कारवाई करू नये. अशा शब्दात एका कीर्तनकाराने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर आपली व्यथा मांडली..वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांसाठी पुणे पोलिसांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमात हा संपूर्ण प्रकार घडला.. अमृतानंद महाराज असं व्यथा मांडलेल्या या कीर्तनकारांचे नाव आहे. 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार मार्गदर्शन करत असताना अमृतानंद महाराज उठून उभे राहिले आणि म्हणाले, मी कथाकार व कीर्तनकार असून, युट्यूबवर माझ्या कथा-कीर्तनाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. मुंढवा ब्रिज परिसरात माझ्या वाहनाला पाठीमागून एका वाहनाने धडक दिली. त्यानंतर मला मुंढवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे मद्यपान तपासणीसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे चाचणी घेण्यात आली. पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत ते म्हणाले, माझी मद्याची चाचणी कधीच पॉझिटिव्ह येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात फोन करून चौकशी करा. मी दारू पितो, असे कोणी सांगितले तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण पोलिसांनी चुकीची कारवाई करू नये. इतक्यावरच न थांबता त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. या ठिकाणी अनेकांवर चुकीची कारवाई झाली आहे. मात्र पोलिसांविरोधात बोलण्याचे धाडस कोणी करत नाही,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही प्रतिक्रिया दिली. “तुमच्या प्रकरणात आमच्याकडून काही चूक झाली असावी, असे वाटते. याची आम्ही पुन्हा एकदा खात्री करू, असे सांगत त्यांनी कीर्तनकाराला आश्वासन दिले. तसेच वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त हिम्मत जाधव यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही अमितेश कुमार यांनी दिले.

दरम्यान, पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. शहरातील ३० ठिकाणी नाकाबंदी करत १९१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे पुणे पोलिसातर्फे समुपदेशन करण्यात आले. मात्र याच मोहिमेदरम्यान समोर आलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रत्यक्षात मद्यपान न करता देखील आपल्यावर कारवाई झाल्याचा दावा करणाऱ्या या कीर्तनकाराच्या प्रकरणामुळे पोलीस कारवाईतील पारदर्शकता आणि तपास पद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title: Action taken against a Kirtankara who never touches alcohol for drunk driving? Grief expressed before the Police Commissioner