अपघातांच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा! ३ वेळा वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स जप्त करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:59 IST2025-11-18T15:59:34+5:302025-11-18T15:59:49+5:30
नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी व या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात

अपघातांच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा! ३ वेळा वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स जप्त करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना
पुणे: शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तीनपेक्षा अधिक वेळा उल्लंघन झाल्यास संबंधिताचा वाहन परवाना नियमानुसार निलंबित करणे व त्यानंतरही उल्लंघन केल्यास परवाना जप्त करण्याची कारवाई करावी. नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी व या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
पुणे शहरातील वाहतूक सुधारणाबाबत विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते. सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पीयुष तिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सेव्ह लाईफ फाउंडेशनने तीन-चार वर्षापूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने अनेक उपाययोजना झाल्या. तथापि, आता झालेला गंभीर अपघात पाहता पुन्हा या मार्गाचा अभ्यास सेव्ह लाईफ फाउंडेशनने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने करवा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. या अनुषंगाने हा अहवाल दोन आठवड्यांत सादर करू, असे तिवारी यांनी सांगितले.
पुलकुंडवार म्हणाले, “ रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी दरमहा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी व आधीच्या बैठकांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण होतील, याची खात्री करावी. सेव्ह लाईफ फाउंडेशनने शहरात वाहतूक कोंडी, अपघात अधिक होणाऱ्या रस्ते, ठिकाणांविषयी अभ्यास करून रस्त्यांच्या डिझाईनमध्ये काही त्रुटी असल्यास उपाययोजना सुचवाव्यात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी. पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार संबंधित रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेने वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वार्डन देण्याची जबाबदारी राहील.”
नवल किशोर राम म्हणाले, “शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची, पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी महापालिकेच्या वतीने ट्रॅफिक वार्डन देण्यात येत आहेत. वाहतूक नियमन कामात खासगी स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा.” वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी कार्यवाही तत्काळ करणे आवश्यक असल्याचे डॉ. म्हसे म्हणाले. वाहतुकीच्या अनुषंगाने एकात्मिक नियंत्रण केंद्र आवश्यक असून त्या अनुषंगाने हैदराबाद येथील नियंत्रण केंद्राचा अभ्यास आवश्यक असल्याचे डुडी म्हणाले. यावर कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.