जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा, नमुने जप्त, भंडारा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:37 IST2025-12-24T09:36:16+5:302025-12-24T09:37:17+5:30
या घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गंभीर चिंता व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.

जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा, नमुने जप्त, भंडारा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात
जेजुरी : खंडोबा गडावर घडलेल्या भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, सोमवारी (दि. २२) जेजुरी शहरात धडक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या वर्षा बारवकर, रजिया शेख, लक्ष्मीकांत सावळे, डॉ. संदीप शिंदे आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खंडोबा गडाच्या मुख्य महाद्वारासह शहरातील विविध ठिकाणी भंडारा विक्रेत्यांची तपासणी केली. यावेळी भेसळयुक्त भंडाऱ्याचे संशयित नमुने ताब्यात घेण्यात आले असून, बेळगाव येथून भंडारा पुरवठा करणारा टेम्पो जप्त करण्यात आला. जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, अण्णासाहेब देशमुख व पोलिस पथक या कारवाईत सहभागी झाले होते. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रविवारी (दि. २१) नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भंडारा अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली असता, अचानक भंडाऱ्याचा मोठा भडका उडाला. या दुर्घटनेत दोन नवनिर्वाचित नगरसेविकांसह सुमारे १६ जण होरपळले. जखमींवर सरकारी, तसेच जेजुरी व पुणे येथे उपचार सुरू असून, काहींची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गंभीर चिंता व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ, खांदेकरी व मानकरी यांच्याकडून भेसळयुक्त व केमिकलयुक्त भंडाऱ्याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. जत्रा-यात्रा नियोजन बैठकीतही भेसळयुक्त भंडारा विक्री रोखण्याचे आवाहन केले जात होते. सन २०२१-२२ मध्ये तत्कालीन विश्वस्त मंडळाने अन्न व औषध भेसळ प्रशासनाच्या पुणे कार्यालयात निवेदन दिले होते. आठ महिन्यांपूर्वी माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे व पत्रकार प्रकाश फाळके यांनी भेसळ प्रतिबंधक मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी ठोस कारवाई झाली नव्हती.
याबाबत जेजुरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, सर्व जखमी सुरक्षित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शासन व प्रशासनाकडून दक्षतेच्या सूचना प्राप्त झाल्या असून, पुढील काळात नगरपालिका व प्रशासनाच्या वतीने केमिकल व भेसळयुक्त भंडारा विक्री, तसेच उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जातील.
दुर्घटनेतून बोध घेण्याची गरज
खंडेरायाच्या जेजुरी नगरीत वर्षातून आठ ते दहा मोठ्या यात्रा भरतात. लाखो भाविक गडकोट व पायरीमार्गावर उपस्थित असतात. दिवटी पेटवणे व भंडारा उधळण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अशा दुर्घटनांमुळे मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मांढरदेवीच्या दुर्दैवी घटनेचा अनुभव लक्षात घेता, जेजुरीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे आणि केमिकलयुक्त, भेसळयुक्त भंडारा कायमस्वरूपी हद्दपार करणे अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.