पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण; २ वर्षांच्या चिमुकलीची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:32 IST2025-07-30T18:32:09+5:302025-07-30T18:32:26+5:30
झोपडपट्टीमधून दोन वर्षांच्या एका चिमुकलीला रात्री आरोपींनी झोपेतून उचलून पळवून नेले होते

पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण; २ वर्षांच्या चिमुकलीची सुखरुप सुटका
पुणे: भीक मागण्यासाठी कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टीमधून अपहरण केलेल्या २ वर्षांच्या चिमुकलीची भारती विद्यापीठ पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने तुळजापूर (धाराशिव) येथून सुखरूप सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
सुनील सीताराम भोसले (५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, जिल्हा धाराशीव), शंकर उजन्या पवार (५० वर्षे) शालुबाई प्रकाश काळे (४५ वर्षे), गणेश बाबू पवार (३५ वर्षे, तिघेही रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापूर, धाराशिव) तसेच मंगल हरफूल काळे, (१९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाइनझोपडपट्टी, खडकी) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंडर सिटी झोपडपट्टीमधून दोन वर्षांच्या एका चिमुकलीला २५ जुलै रोजी रात्री कोणी तरी झोपेतून उचलून पळवून नेले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिमुकलीच्या शोधासाठी भारती विद्यापीठ पोलिसांची दोन पथके तयार केली होती तसेच गुन्हे शाखेनेही तपास पथके तयार करून कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानच्या रोडवरील सर्व आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले केले. त्यामध्ये दोन पुरुष व एक महिला एका दुचाकी गाडीवरून पीडित मुलीस घेऊन पुणे रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी आरोपींसोबत आणखी दोन आरोपी आढळले. त्या ठिकाणावरून आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व आरोपी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी असल्याची माहिती भारती विद्यापीठ व गुन्हे शाखा, युनिट २च्या तपास पथकाला मिळाली.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मोकाशी, पोलिस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट २चे सहायक पोलिस निरीक्षक कवठेकर व पोलिस अंमलदार अशी दोन पथके तुळजापूरला पोहचली. धाराशिव एलसीबी पोलिसांच्या मदतीने कौशल्यपूर्ण पध्दतीने तपास केला. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर चिमुकली सुखरुप असून, भीक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील चिमुकलीची सुखरुप सुटका केली.