पुणे : ढोल-ताशांचा गजर, टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट, लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकामध्ये असलेली सायकलपटूंना पाहण्याची उत्सुकता आणि जंगली महाराज रस्त्यावर उसळलेला जनसागर अशा रोमांचक वातावरणात पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेची शुक्रवारी सांगता झाली. सायकल स्पर्धेसाठी मी एवढी गर्दी कधीही पाहिली नाही, हे विजेत्या ल्यूक मडग्वेचे उद्गार ऐकताच पुन्हा जल्लोष सुरू झाला.
पुणे ग्रॅण्ड टूरच्या ‘पुणे प्राइड लूप’ या शेवटच्या टप्प्याला श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी म्हाळुंगे-बालेवाडी येथे दुपारी दीड वाजता सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेते आमीर खान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते शर्यतीचा फ्लॅगऑफ करण्यात आला. यावेळी आमीर खानने पुढील वर्षी यापेक्षा मोठी स्पर्धा होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
अभिनेता आमीर खान बोलायला येताच चाहत्यांनी मराठीचा आग्रह धरला. या वेळी आमीर म्हणाला की, नमस्कार मित्रांनो, जय पुणे, जय महाराष्ट्र, जय भारत. पुण्याने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. हजारो पुणेकरांनी रस्त्यावर उतरून शिस्त आणि सायकलपटूंप्रती आदर व प्रेम दाखविला हे पाहणे खूप संस्मरणीय आहे. पोलीस आणि प्रशासनाला मी धन्यवाद देतो. त्यांनी स्पर्धा आयोजनात मोलाची भूमिका बजावली. अंतिम रेषेवर सायकलपटूंना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक होतो.
स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सायकलपटू मार्गस्थ झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये स्पाईन रोड, इंद्रायणीनगर भागात सायकलप्रेमींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. पुण्यातही प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा थांबून पुणेकर सायकलपटूंना प्रोत्साहन देत होते. यावेळी सायकलपटूंचे फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी चढाओढ सुरू होती. शर्यत जंगली महाराज रस्त्यावर येण्याआधीच हजारो पुणेकरांनी येथे गर्दी केली होती. ढोल-ताशाच्या गजरात सायकलपटूंचे स्वागत करण्यात आले. विजेत्या सायकलपटूंना पाहण्यासाठी संपूर्ण जंगली महाराज रस्त्यावर तुफान गर्दी झाली होती. विजेता ल्यूक मडग्वे आणि इतर गटातील विजेत्यांनी इंदू हे मॅस्काॅट चाहत्यांमध्ये भिरकावल्यावर ते घेण्यासाठी गर्दी उसळली. त्यानंतर शेवटच्या गटातील मॅस्काॅट ल्यूकने एका लहान मुलीला भेट देत सर्वांची मने जिंकली.
सेल्फीसाठी गर्दी
समालोचक चैतन्य राठी यांनी आमीर खानला चाहत्यांसोबत सेल्फी घेण्याची विनंती केल्यानंतर आमीरने स्टेजच्या सर्व बाजूला उभ्या चाहत्यांसोबत फोटो घेतले. याटवेळी पुणेकरांनी हात उंचावत जल्लोष केला.
Web Summary : Aamir Khan attended the Pune Grand Tour cycling finale, expressing hope for an even larger event next year. He praised Pune's organization and the crowd's enthusiasm.
Web Summary : पुणे ग्रैंड टूर साइकिल के समापन में आमिर खान शामिल हुए। उन्होंने अगले साल और भी बड़े आयोजन की उम्मीद जताई और पुणे के आयोजन व भीड़ की सराहना की।