Pune Crime: नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:17 IST2026-04-01T14:17:22+5:302026-04-01T14:17:58+5:30
नळ जोडणीच्या कारणावरून दोघांमध्ये आपापसात भांडणे झाल्यावर एकाचा खून झाला तर आणखी तिघे गंभीर जखमी झाले

Pune Crime: नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना
दौंड : राजेगाव (ता. दौंड) येथे नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयता आणि काठीने वार करून एका युवकाचा खून करण्यात आला, तर तिघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार (दि.३०) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत विजेंद्र भोसले (वय ३८, रा. राजेगाव, ता. दौंड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर स्वरूप भोसले, आदेश भोसले, ऋषिकेश भोसले (सर्व राहणार, राजेगाव, ता. दौंड) यांच्यावर कोयता आणि काठ्यांनी वार झाल्यामुळे तिघेजण जखमी झाले आहे
दरम्यान, याप्रकरणी जनार्दन भोसले, महेश भोसले (रा. राजेगाव, ता. दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर दिनेश भोसले, योगेश भोसले, राज भोसले, नीलेश भोसले हे चौघे फरार झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आणि सायंकाळी नळ जोडणीच्या कारणावरून दोघांमध्ये आपापसात भांडणे झाली होती. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी विजेंद्र भोसले यांच्या घराजवळ गेले. यावेळी आरोपींनी विजेंद्र भोसले याला पकडून ठेवले. यावेळी दिनेश भोसले याने त्याच्या हातातील कोयत्याने विजेंद्र यांच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला, तर तिघांना गंभीर जखमी केले आहे. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.