सारसबागेतील लाडक्या बाप्पाला लोकरीचा स्वेटर अन् कानटोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:38 IST2025-11-20T13:37:36+5:302025-11-20T13:38:02+5:30
सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचे स्वेटर, कानटोपी असा पेहराव करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जात आहे

सारसबागेतील लाडक्या बाप्पाला लोकरीचा स्वेटर अन् कानटोपी
पुणे : हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी वापरतो तसेच सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचे स्वेटर, कानटोपी असा पेहराव करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जाते. त्यामुळे यंदाही ही परंपरा जोपासताना श्री देवदेवेश्वर संस्थानने सारसबागेतील अर्थात तळ्यातील गणेशाच्या मूर्तीला स्वेटर आणि कानटोपी घातली आहे.
दरम्यान, पुण्यात थंडी वाढल्याने या तळ्यातील गणपतीला थंडीसाठी स्वेटर व कानटोपी असा पोशाख परिधान करण्यात आला आहे. या ठिकाणी दरवर्षी हिवाळ्यात गणपती बाप्पाला स्वेटर व कानटोपी परिधान करण्यात येते. सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपतीसुद्धा म्हटलं जातं. हिवाळ्यामध्ये या गणपतीची खास चर्चा रंगते. कारण हिवाळा सुरू झाला आणि जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर व कानटोपी घातले जाते. दरवर्षी या गणपतीचे स्वेटर व कानटोपीमधील फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुद्धा गणपतीने स्वेटर व कानटोपी घातलेले दिसत आहे. बाप्पाचं हे मनमोहक रूप तासनतास पाहत राहावसं वाटतं.
रात्रीच्या थंडीत स्वेटर व कानटोपी घालून सजलेले बाप्पाचे ध्यान पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. सात दिवसांचे सात रंगाचे स्वेटर व कानटोपी बाप्पासाठी तयार असतात. रात्री बाप्पाला स्वेटर आणि कानटोपी चढविली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी काढली जाते.
२४० वर्षांपूर्वीचे मंदिर
पुण्यातील सारसबागेत तळ्यातील गणपती प्रसिद्ध आहे. पुण्यातील सर्वात जुने आणि सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक हे गणपती मंदिर आहे. हे मंदिर २४० वर्षे जुने असून, श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी बांधलेले आहे. मंदिरात अतिशय सुरेख अशी संगमरवरी गणेश मूर्ती आहे. श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे. सारसबागचा गणपती बघायला दूरवरून लोक येतात.