११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; फुरसुंगीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:23 IST2025-11-13T11:23:22+5:302025-11-13T11:23:46+5:30
विद्यार्थ्यांनो आयुष्याच्या टर्निंग पॉंईंटवर असे प्रकार करू नका, कायम लढत राहा

११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; फुरसुंगीतील घटना
पुणे : फुरसुंगी परिसरातील एका खासगी अकादमीत संरक्षणविषयक प्रशिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १०) दुपारी घडली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवधूत उल्हास बडे (१६, रा.हांडेवाडी, मूळ, रा.आनंदनगर, बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अवधूत हा इयत्ता ११वीमध्ये शिकत असून, ‘एनडीए’ प्रवेशासाठी हांडेवाडीतील यशोतेज या खासगी अकादमीत प्रशिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्याने येथील राहत्या खोलीत गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच, अवधूतला तत्काळ रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये
विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य असतात. १५ ते १८ या वयाच्या टर्निंग पॉइंटला अनेक आव्हाने समोर येत असतात. कुठलं क्षेत्र निवडल्यावर पुढे फायदा होईल. चांगली नोकरी मिळेल. तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल. असे अनेक विचार येत असतात. अशा वेळी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ, शिक्षक, पालक, मित्रांचा सल्ला अथवा मार्गदर्शन घ्यावे. कुठल्याही गोष्टीत अपयश आले तर खचून जाऊ नये. १५ - १६ वय ही तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. अजून पुढंही तुम्हाला खूप काही शिकायचं आहे. स्मरणात राहणारे अनुभव येणार आहेत. तर खचून न जाता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करू नये. कायम लढत राहा असे आवाहन लोकमतच्या माध्यमातून करण्यात येत आहे.