शिरूरच्या दुष्काळी १२ गावांच्या पाणीप्रश्नावर अधिवेशनात तोडगा काढणार - राधा कृष्ण विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:44 IST2026-03-06T19:44:08+5:302026-03-06T19:44:20+5:30
या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण पुन्हा भेट देणार असून त्याआधी १५ मार्च रोजी संबंधित गावांतील प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल - विखे पाटील

शिरूरच्या दुष्काळी १२ गावांच्या पाणीप्रश्नावर अधिवेशनात तोडगा काढणार - राधा कृष्ण विखे-पाटील
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पाबळ, केदूर व परिसरातील दुष्काळी बारा गावांच्या पाणीप्रश्नावर याच अधिवेशनात तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असा शब्द जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे व शेखर पाचुंदकर यांनी दिली.
या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तातडीने काम केले जाईल, असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी यापूर्वी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान दिले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.४) तालुक्यातील भाजप पदाधिकारी व जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२५ फेब्रुवारी रोजी शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील बारा गावांना शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी काही प्रस्ताव मंत्री विखे पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राहुल कुल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, जि.प. सदस्या जयश्री पलांडे, शेखर पाचुंदकर, मारुती शेळके, भरत साकोरे, दत्तुदादा भगत, दीपक खैरे आदी उपस्थित होते. बैठकीत सर्वेक्षणाचे अहवाल तयार झाले असून दोन ते तीन पर्यायी आराखडेही तयार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण पुन्हा भेट देणार असून त्याआधी १५ मार्च रोजी संबंधित गावांतील प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. त्यानंतर याच अधिवेशनात पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिल्याचे जयश्री पलांडे यांनी सांगितले.