भीमाशंकरच्या जंगलात रिक्षाचालकाने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:25 IST2025-07-14T17:25:27+5:302025-07-14T17:25:58+5:30

ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये घेतले, तसेच त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये असे घेऊन व्यापाऱ्याला जंगलातच सोडून रिक्षाचालक पसार झाला.

A rickshaw puller robbed a businessman at knifepoint in the forests of Bhimashankar. | भीमाशंकरच्या जंगलात रिक्षाचालकाने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले

भीमाशंकरच्या जंगलात रिक्षाचालकाने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले

पुणे : व्यापाऱ्याला रेल्वे स्टेशन गेटसमोरून बसवून भीमाशंकरच्या जंगलात नेत रिक्षाचालकाने लुटल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी एका ६१ वर्षीय व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी दक्षिण दिल्लीतील रहिवासी आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शनिवारी (दि. १२) सकाळी नऊच्या सुमारास ते पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेने उतरले. त्यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जायचे होते. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील पार्सल कार्यालयासमोर एक रिक्षाचालक थांबला होता. व्यापाऱ्याने भीमाशंकरला दर्शनासाठी जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन जातो, असे सांगत, अंतर लांबचे असल्याने अगोदरच भाडे निश्चित केले होते. भीमाशंकर दर्शनासाठी जादा रिक्षा भाडे द्यावे लागेल, असे रिक्षाचालकाने त्यांना सांगितले.

त्यानंतर रिक्षाचालक सकाळी सव्वानऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून व्यापाऱ्याला घेऊन निघाला. दुपारी एकच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन भीमाशंकर येथे पाेहोचला. दर्शन घेतल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन पुण्याकडे निघाला. भीमाशंकर परिसरातील जंगलातील रस्त्यावर रिक्षाचालकाने बतावणी करून रिक्षा थांबवली. त्यानंतर व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याला धमकावून ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये घेतले, तसेच त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये असे एकूण १९ हजार ५०० रुपये लुटले. त्यानंतर जंगलातच व्यापाऱ्याला सोडून रिक्षाचालक पसार झाला. घाबरलेला व्यापाऱ्याने या घटनेची माहिती तेथून जात असलेल्या भाविकांना दिली. व्यापाऱ्याने शहरात येत थेट बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरील पार्सल कार्यालय परिसरात भेट देत, या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा (एमएच १२ आरपी ६२८६) शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Web Title: A rickshaw puller robbed a businessman at knifepoint in the forests of Bhimashankar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.