गोल्फच्या मैदानातून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला; गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 09:17 IST2025-04-02T09:16:28+5:302025-04-02T09:17:21+5:30
गोल्फ क्लब मैदानातून चेंडू बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ असून यापूर्वीही असाच प्रकार घडला होता

गोल्फच्या मैदानातून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला; गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
किरण शिंदे
पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला. त्यानंतर हाच चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवरही आदळला. अचानक आलेल्या या चेंडूने उड्डाणपुलावर एकच तारांबळ उडाली होती. या घटनेनंतर संबंधित तरुणांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. प्रणील अनिल कुसळे (वय ३५, रा. येरवडा, पुणे) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रणील आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी दुचाकीने येरवडा परिसरातील गुंजन चौकातून जेल रस्त्याकडे निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी उड्डाणपूलावर आली असताना गोल्फ क्लबच्या मैदानातून आलेला पांढऱ्या रंगाचा चेंडू प्रणीलच्या छातीवर आदळला. त्यानंतर हाच चेंडू उड्डाण पुलावरील इतर वाहनांवरही जाऊन आदळला. या घटनेनंतर प्रणिल यांनी येरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. तक्रार अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनी येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गोफ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान गोल्फ क्लब मैदानातून चेंडू बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दीड वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. गोल्फ क्लब मैदानातून आलेला एक चेंडू दुचाकी स्वाराच्या तोंडावर आदळला होता. तेव्हाही येरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा घडल्याने येथील सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.