खडकवासला धरण साखळीत ९१ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ टीएमसी पाणीसाठा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:52 IST2025-07-28T13:51:46+5:302025-07-28T13:52:01+5:30
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरु

खडकवासला धरण साखळीत ९१ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ टीएमसी पाणीसाठा जास्त
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २६.५४ टीएमसी म्हणजे ९१.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टीएमसीने म्हणजे ९ टक्के पाणीसाठा जास्त आहे. खडकवासला धरणातून नदीत १८ हजार ४८३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. रविवारी २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही धरणांत २६. ५४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टीएमसीने म्हणजे ९ टक्के पाणीसाठा जास्त आहे. धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
५.५७ टीएमसी पाणी नदीत सोडले
खडकवासला धरणातून आतापर्यंत नदीत ५.५७ टीएमसी पाणी सोडले आहे. वरसगाव, पानशेतधरणातूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सायंकाळी सहा वाजता नदीत १८ हजार ४८३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने शहराच्या विविध पुलांवर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून १८ हजार ४८३ क्यूसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पुणे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा अलर्ट झाली आहे. पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या आहेत.
धरण टीएमसी टक्के
खडकवासला १.४९ ७५. ६०
पानशेत ९. ७९ ९१.९१
वरसगाव १२.०७ ९४. १६
टेमघर ३. १९ ८५ .९०
एकूण २६.५४ ९१. ०३