Navale Bridge Accident: ७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:20 IST2025-11-14T10:19:32+5:302025-11-14T10:20:22+5:30
नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे

Navale Bridge Accident: ७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे
पुणे: बंगळुरू - पुणेमहामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले. ही संध्याकाळ सात निष्पाप जीवांसाठी 'काळ' ठरली. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ७ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ७ जणांमध्ये एक ५ वर्षांची चिमुकलीही आहे. बाल दिनाच्या पूर्वसंध्येलाच बालिकेचा असा अंत झाल्याने सर्वच पुणेकर हळहळले.
कायमस्वरूपी उपाययोजना राबवा
या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. ‘नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
तत्काळ पुढील उपाययोजना करणे गरजेचे
१) नवले पूल ते वारजे या महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करावा
२) परिसरातील अतिक्रमणे कायमस्वरूपी काढणे गरजेचे
३) स्वामीनारायण मंदिरासमोरील सर्व्हिस रोडवर दररोज वाहतूककोंडी होते. येथील पूल मोठा करणे आवश्यक.
४) नवले पूल ते वारजे दरम्यानच्या जागामालकांना एफएसआय किंवा मोबदला देऊन त्यांच्याकडून जागा ताब्यात घेऊन महापालिकेचा सर्व्हिस रोड तयार करणे गरजेचे.
५) अपघात रोखण्यासाठी आरटीओ प्रशासनाने बोगद्याजवळ अवजड वाहने थांबवून क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे?