मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:10 IST2025-01-23T10:10:07+5:302025-01-23T10:10:45+5:30

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे सरकार करत आहे

65 percent of the ministers in the cabinet are accused of murder, corruption; Immediately take the resignations of those who are stained - Nana Patole | मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

पुणे: ‘राज्य सरकार मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचारासह वेगवेगळे आरोप आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच, त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. सरकारला जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगून सरकारने डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत.’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सध्याचे सरकार हे महाराष्ट्र लुटणारे आणि खोटे एन्काऊंटर करणारे सरकार आहे. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबाग येथील निवासस्थानी पटोले यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते. पवार यांच्या समवेतच्या भेटीमागील कारण सांगताना पटोले म्हणाले, ‘विधिमंडळाच्या समित्यांबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यायची आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या नावाचीही चर्चा करून द्यायची होती.

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे महाजंगलराज सरकार करत आहे.' अशी टीका पटोले यांनी केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जात होते, त्या योजनेमध्ये तत्कालीन कृषिमंत्र्यांनी बदल केले. हे बदल नेमके कशासाठी केले, कॅबिनेटने त्यास का मान्यता दिली, असे प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहेत. शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे काम सरकारने केले आहे. कृषी साहित्य किमतीपेक्षा चार पट जादा दराने घेऊन त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला होता. त्यावेळच्या आयुक्तांनी त्यास विरोध केल्यामुळे त्यांचीही बदली करण्यात आली होती. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे, असे पटोले म्हणाले.

पक्षात लवकरच मोठे बदल होणार

आमच्या पक्षात लोकशाही आहे, माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे माझ्या जागी दुसरा बदल करावा, याबाबत मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र दिलेले आहे. पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार हायकमांडच्या हातात आहेत, त्यादृष्टीने येत्या काळात पक्षात मोठे फेरबदल होतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

Web Title: 65 percent of the ministers in the cabinet are accused of murder, corruption; Immediately take the resignations of those who are stained - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.