पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून ५९ वर्षीय मौलानाची फसवणूक; संपत्ती बळकावून तिसरा विवाह
By नितीश गोवंडे | Updated: December 16, 2024 21:01 IST2024-12-16T21:00:56+5:302024-12-16T21:01:23+5:30
मौलानाशी विवाह केल्यावर वर्षभरात त्याच्याकडील सोने, नाणे, गाडी, घर असे सर्व बळकावून तिने तिसरा विवाह करून फसवणूक केली

पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून ५९ वर्षीय मौलानाची फसवणूक; संपत्ती बळकावून तिसरा विवाह
पुणे: फसवणुकीच्या उद्देशाने तीने आपल्या पहिल्या पतीचे निधन झाल्याचे सांगून तिने एका मौलानाशी दुसरा विवाह केला. त्यानंतर वर्षभरात त्याच्याकडील सोने, नाणे, गाडी, घर असे सर्व बळकावून तिने तिसरा विवाह करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढवा येथील एका ५९ वर्षीय मौलाना यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आलीया नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान कोंढव्यात घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे एका मदरशामध्ये मौलाना आहेत. आरोपी महिलेने त्यांना आपल्या पहिल्या पतीचे निधन झाल्याचे खोटे सांगितले. आर्थिक फसवणुकीच्या हेतूने त्यांच्याशी लग्न केले. त्या पुणे व पालघर येथे जाऊन येऊन राहत होत्या. या वर्षभरात फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सोने, रोख रक्कम, गाडी, घर असा १४ लाख रुपयांचा ऐवज घेतला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याशी तिसरे लग्न केले. याचा फिर्यादी यांनी जाब विचारला असताना त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत.