५ जण शटर उघडून आत शिरले; दारूची मागणी, बंद झाल्याचे सांगताच कोयत्याचा धाक दाखवून लुटले २० हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:41 IST2025-11-19T17:40:19+5:302025-11-19T17:41:16+5:30
एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे

५ जण शटर उघडून आत शिरले; दारूची मागणी, बंद झाल्याचे सांगताच कोयत्याचा धाक दाखवून लुटले २० हजार
पुणे : धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना एरंडवणा येथील एका रेस्टो बारमध्ये सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. त्यानंतर याच बारमध्ये दारू मागण्याच्या निमित्ताने घुसलेल्या पाच जणांनी दरोडा टाकून १५ ते वीस हजाराची रोकड पळवल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार अनिल कदम (वय २७, रा. नारायण पेठ) व त्यांचा मित्र यश राहुल मारुलकर त्यांनी डी पी रोडवरील हॉटेलमध्ये जेवण केले. बाथरुमला जायचे असल्याने ते एरंडवणा येथील एका बारमध्ये गेले. बाथरुममधून बाहेर येताना ओंकार कदमचा एकाला धक्का लागला. त्यावेळी ओंकार त्याला सॉरी म्हणाला. मात्र, त्यानंतरही धक्का लागलेल्याने त्याच्या इतर चार साथीदारांना बोलावून ओंकार कदमला व मारुलकर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने ओंकारच्या डोक्यात लोखंडी कड्याने मारले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले.
हे पाहून ते चारही जण पळून गेले. त्यानंतर याच बारमध्ये बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एरंडवणा येथील अनंत हॉटेल रेस्टो अॅन्ड बारचे शटर खाली ओढून आवराआवरी सुरु होती. त्यावेळी हुडी घातलेले पाच जण शटर उघडून आत शिरले. त्यांनी दारुची मागणी केली. तेव्हा बार व्यवस्थापकाने बार बंद झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवुन गल्ल्यातील १५ ते २० हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेले. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास करीत आहेत.