पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:43 IST2026-02-03T20:43:16+5:302026-02-03T20:43:59+5:30
दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ असून त्या इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे

पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण
पुणे: पुणे महापालिकेच्या १६५ नगरसेवकांमध्ये ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ आहे. त्यामध्ये इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या ३३ आहेत. केवळ १४ नगरसेवकांचे शिक्षण ‘पदव्युत्तर पदवी’पर्यंत झाले आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक झाली. त्यात ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून आले. त्यात भाजपच्या ११९ , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) २७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ३ , काँग्रेसचे १५ आणि उद्धवसेना पक्षाचा १ उमेदवार निवडून आलेला आहे. पुणे शहराचा कारभार हे नगरसेवक हाकणार आहेत. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. या १६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्वसाधारण २० टक्के म्हणजे ३३ सदस्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, २५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत.
पदविका मिळविलेले सदस्य : ५
पदव्युत्तर शिक्षण : १४
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले : ३३
दहावीपर्यंत शिकलेले नगरसेवक : ४५
पदवी घेतलेले सभासद : ६१
शिक्षणाची माहिती उपलब्ध नसलेले नगरसेवक : ७