पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:24 IST2025-10-06T12:23:30+5:302025-10-06T12:24:06+5:30
पिकपचा धक्का लागून तो पिकपच्या मागील बाजूला पडल्यावर अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला

पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
अवसरी (आंबेगाव तालुका) : पिकप गाडी रिव्हर्स घेत असताना किन्नर बाजूने पीकअप गाडीखाली येऊन ४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना गावडेवाडी ता. आंबेगाव येथे घडली आहे. सिद्धांत गणेश कठाळे असे या लहान मुलाचे नाव आहे. याबाबत संतोष गणेश कठाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर अपघात करून लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पिकअप चालक संतोष काकासाहेब कठाळे (वय ४० रा गावडेवाडी रासुरामळा) यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक ५/१०/२०२५ रोजी सकाळी अकरा वाजल्याचा सुमारास गावडेवाडी गावच्या हद्दीत शेरीमळा येथील फ्लावरच्या शेतात फिर्यादी गणेश काकासाहेब कठाळे यांचा भाऊ संतोष काकासाहेब कठाळे हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकप एम एच १२ टी.व्ही ३२७७ ही गाडी रिव्हर्स घेत होता. त्यावेळी सिद्धांत गणेश कठाळे याला पिकपचा धक्का लागून तो पिकपच्या मागील बाजूला पडला. त्यावेळी त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात संतोष कठाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मांडवे करत आहेत.