पुणे : राज्यात गेल्या नऊ महिन्यांत चिकुनगुनियाचे या डासजन्य विषाणूजन्य आजाराचे एकूण २६४५ रुग्ण निदर्शनास आले असून, सुदैवाने कोणताही मृत्यू झाला नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. २०२४ या वर्षात चिकुनगुनिया रुग्णसंख्या ५८५४ इतकी होती, त्यामुळे यंदा तुलनेने रुग्णसंख्येत घट झाली असल्याचेही विभागाने सांगितले.
चिकुनगुनिया विषाणूचा प्रसार एडीस एजिप्टाय या डासांमार्फत होतो. या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक येणारा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ (चट्टे) उमटणे, मळमळ, उलटी, तसेच सांध्यांमध्ये वेदना व सूज होणे. काही रुग्णांमध्ये या सांध्यातील वेदना दीर्घकाळ टिकतात. राज्यभर डास नियंत्रण मोहिमा राबविण्यात येत असून, घरांच्या आणि कार्यालयांच्या परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगरपालिकांद्वारे नियमित फॉगिंग, लार्वा नाशक औषधफवारणी तसेच नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती मोहिमा सुरू आहेत. चिकुनगुनिया नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. घरगुती पाणीसाठे, कुंड्या, टाक्या, बादल्या यांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ताप, अंगदुखी, सांधेदुखीची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी. राज्यात डेंग्यूप्रमाणेच चिकुनगुनिया या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधक उपाययोजना सुरू असून, आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी स्वच्छता आणि डास प्रतिबंध याबाबत जबाबदारीने वागल्यास या आजाराचा प्रसार रोखता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांतील चिकुनगुनियाची रुग्णसंख्या
सन २०२० पासून राज्यातील चिकुनगुनिया परिस्थितीवर नजर टाकल्यास, रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येतात.
२०२० : ४२२९ तपासण्यांपैकी ७८२ रुग्ण.२०२१ : १९,३६३ तपासण्यांपैकी २५२६ रुग्ण.२०२२ : १४,७५८ तपासण्यांपैकी १०८७ रुग्ण.२०२३ : ३०,८९२ तपासण्यांपैकी १७०२ रुग्ण.२०२४ : ५७,४५३ तपासण्यांपैकी ५८५४ रुग्ण.२०२५ (३० सप्टेंबरपर्यंत) : ३४,१०१ नमुन्यांपैकी २६४५ रुग्ण.
सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे
२०२५ मध्ये सर्वाधिक चिकुनगुनिया रुग्ण पालघर (२८७), अमरावती (२१९), अकोला (१५४), कोल्हापूर (७०), सांगली (६२), धाराशिव (५४), नाशिक (५०), सिंधुदुर्ग (४४) या जिल्ह्यांत आढळले. तसेच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बृहन्मुंबई (६२४), पुणे (२०८), नाशिक (५३), अकोला (१५२), अमरावती (६३), कोल्हापूर (४७), सांगली-मिरज (४६), वसई-विरार (१७) रुग्ण नोंदवले गेले आहेत.
Web Summary : Maharashtra reports 2,645 Chikungunya cases in nine months, a decrease from last year. No deaths reported. Precautionary measures are underway; public cooperation is vital for control.
Web Summary : महाराष्ट्र में नौ महीनों में चिकुनगुनिया के 2,645 मामले सामने आए, जो पिछले साल से कम हैं। कोई मौत नहीं हुई। एहतियाती उपाय जारी हैं; नियंत्रण के लिए जन सहयोग महत्वपूर्ण है।