Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणाकडे जाण्यासाठी यंदा २०० एसटी; प्रवासही साताऱ्यामार्गे होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:33 IST2024-08-27T15:33:18+5:302024-08-27T15:33:54+5:30
कोकणवासीयांचा गावी जाण्याचा रस्ता असलेल्या वरंधा घाटात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रवास साताऱ्यामार्गे होणार आहे

Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणाकडे जाण्यासाठी यंदा २०० एसटी; प्रवासही साताऱ्यामार्गे होणार
पुणे: महाराष्ट्रातील कोकणातीलगणेशोत्सव (Konkan Ganeshotsav) हा जगप्रसिद्ध आहे. पुणे, मुंबईत कामानिमित्त असलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणाकडे जातात. पुण्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खास करून एसटीकडून (ST Bus) विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाची सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत (दि. २६) गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडून २०० गाड्या बुुकिंग करण्यात आल्या असून, यामध्ये १६० गाड्या आरक्षण, तर ६० गाड्या ग्रुप बुकिंग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. (Ganeshotsav 2024)
गणेशोत्सव, शिमगा हे कोकणवासीयांचे आवडीचे सण. या सणाला पुणे, मुंबई व इतर ठिकाणी कामानिमित्त असलेले कोकणातील चाकरमानी गावी जातात. त्यामुळे एसटी, रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून कोकणासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात येते. यंदाही एसटीच्या पुणे विभागाकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार सोडण्यात आलेल्या २०० अतिरिक्त गाड्या फुल्ल झाल्या असून, एसटीच्या आरक्षण सेवेला आणि ग्रुप बुकिंगला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यंदा एसटी आरक्षणास प्रतिसाद
यंदा जोरदार आणि ढगफुटीसदृश पावसामुळे कोकणवासीयांचा गावी जाण्याचा रस्ता असलेल्या वरंधा घाटात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे यंदा एसटीतून कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांचा प्रवास साताऱ्यामार्गे होणार आहे. तरी ही प्रवाशांकडून यंदा एसटी आरक्षणास प्रतिसाद मिळत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २०० बस बुकिंग झाल्या आहेत. यामध्ये आरक्षणाच्या १४० गाड्या आहेत, तर ग्रुप बुकिंगच्या ६० बस आहेत. ज्या प्रवाशांना ग्रुप करून गावी जायचे असेल, त्यांनी आताच स्वारगेट किंवा शिवाजीनगर आगारात मागणी करावी. त्यांनाही बस उपलब्ध करून देण्यात येईल. - प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग