अपार्टमेंटमधील १६ दुचाकी वाहने जळून खाक; दौंड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:21 IST2025-12-29T18:21:26+5:302025-12-29T18:21:37+5:30
सदरची वाहने नेमकी कशामुळे जळाली याचा उलगडा अद्याप झाला नसून या घटनेचा पोलीस शोध घेत आहेत

अपार्टमेंटमधील १६ दुचाकी वाहने जळून खाक; दौंड तालुक्यातील घटना
दौंड : लिंगाळी (ता. दौंड ) परिसरातील कल्पतरू अपार्टमेंटमधील १६ दुचाक्या जळून खाक झाल्या आहे. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे अपार्टमेंटमधील वाहन मालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरची वाहने नेमकी कशामुळे जळाली याचा उलगडा अद्याप झाला नसून या घटनेचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती ठाणे अंमलदार महेंद्र गायकवाड यांनी दिली.
याप्रकरणी अपार्टमेंटमधील रहिवासी हनीफ तांबोळी यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग शॉर्टसर्किटने लागली की गाड्या पेटवून दिल्या हे मात्र गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक २९ डिसेंबर मध्यरात्रीच्या सुमारास लिंगाळी हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये ही घटना घडली. या घटनेत १५ दुचाकी वाहने आणि १ नॅनो कार जळाली आहे. प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड करीत आहेत.