Video: पुण्यात भाजपच्या १५ ते २० कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 21:56 IST2022-05-25T21:47:50+5:302022-05-25T21:56:53+5:30
राष्ट्रवादी आणि भाजपच्या तणावात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे दिसू लागले आहे.

Video: पुण्यात भाजपच्या १५ ते २० कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण
पुणे: पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यास भाजपच्या १५ ते २० कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. आप्पा जाधव असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भाजपच्या माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुरु आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या तणावात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे दिसू लागले आहे.
अप्पा जाधव यांचे नारायण पेठेत हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळेत जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी भाजपच्या माथाडी सेलचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे हे त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आले. त्याने जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच मारहाण केली. कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोडही केली. त्यानंतर सर्वजण दुचाकीवरुन पसार झाले. जाधव यांना मारहाणीत दुखापत झाली आहे.
पुण्यात भाजपच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण #pune#NCP#BJPpic.twitter.com/yoP8Dk5xB0
— Lokmat (@lokmat) May 25, 2022
अप्पा जाधव यांना मारहाण होऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाधव यांच्या कार्यालयाजवळ धाव घेतली होती. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले आहे. त्यानंतर कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.