SSC Result 2025: राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:27 IST2025-07-29T17:26:15+5:302025-07-29T17:27:13+5:30
राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे.

SSC Result 2025: राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट
पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २९) जाहीर झाला. त्यानुसार राज्यात १३,७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ३८,७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३७,५७६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले हाेते. यंदाच्या निकालाची टक्केवारी ३६.४८ असून, गतवर्षीच्या तुलनेत (३६.७८) यात ०.३० टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.
सदर पुरवणी परीक्षा दि. २४ जून ते ०८ जुलै दरम्यान पार पडली. यात एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १३,३८९ एवढी हाेती. नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जून-जुलै २०२५ च्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झाले हाेते.
या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १.०० वाजता मंडळाच्या https://www.mahahsscboard.in आणि http://sscresult.mkcl.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल डाउनलाेड करता येणार आहे.
पुरवणी परीक्षेतही मुलींचीच बाजी
दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचीच संख्या अधिक असते. यंदाही त्याचा प्रत्यय आला. आता पुरवणी परीक्षेतही मुलींचा टक्का अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे.
विभाग - नाेंदणी झालेले विद्यार्थी - प्रविष्ट - उत्तीर्ण
पुणे - ७६७१ - ७४२३ - १९०९
नागपूर - ४७१५ - ४६२२ - २०१८
छत्रपती संभाजीनगर - ४६८३ - ४५६० - २१६२
मुंबई - ९५८१ - ९२२४ - १७९२
काेल्हापूर - २३०३ - २२५६ - ४९६
अमरावती - २३३३ - २२७१ - १११९
नाशिक - ४५३० - ४४३६ - २८५३
लातूर - २६९७ - २५९६ - १३०८
काेकण - १९१ - १८८ - ५२
विभागनिहाय मागील वर्षाच्या तुलनेत निकालामध्ये झालेला चढ-उतार
विभाग - यंदाची (२०२५) टक्केवारी - मागील (२०२४) वर्षाची टक्केवारी
पुणे - ३५.७१ - २८.६०
नागपूर - ४३.६६ - ४९.९१
छत्रपती संभाजीनगर - ४७.४१ - ४९.९४
मुंबई - १९.४२ - २७.७६
काेल्हापूर - २१.९८ - ३२.८१
अमरावती - ४९.२७ - ४०.२१
नाशिक - ६४.३१ - ५२.०६
लातूर - ५०.३८ - ५०.३४
काेकण - २७.६५ - ४२.५४