विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:20 IST2025-09-02T10:20:42+5:302025-09-02T10:20:52+5:30
विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले

विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक
पुणे : सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने गांजा तस्करी रॅकेट पकडले असून पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांकडून १३ किलो ७२५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सीमा शुल्कने चारजणांना अटक करून त्यांच्याकडून गांजाची २६ पाकिटे जप्त केली आहेत.
आलिया इलियास अन्सारी (२४), मोहम्मद कैफ अन्सारी (२३, सोनाजीनगर, मुंब्रा), जहिदहुसेन शेख (२९, रा. किल्ला परडी, वलसाड, गुजरात) अणि झैबुनिसा अमिन शेख (४५, रा. धानानी नगर रोड, भोईसर ईस्ट, पालघर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने बँकॉकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या आलिया, मोहम्मद, जहिदहुसेन यांच्याकडे संशयास्पद बॅग आढळली. स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले. त्यात हिरवट रंगाची सुकी वस्तू असल्याचे दिसून आली. त्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या पॅकेट्सचे एकूण वजन १३ किलो ७२२ ग्रॅम आहे. आलिया अन्सारीकडे चौकशी केल्यानंतर विमानतळाबाहेर त्यांचा हॅण्डलर म्हणून जैनबुनीसा शेख थांबल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार जैनबुनीसा हिच्यासह चारही आरोपींना कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत हे एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास कस्टम विभागाच्या एअर इन्टेलिजन्स विभागाचे प्रिन्स कुमार करत आहे.