ठाणे शहर काँग्रेस कामचुकार पदाधिकाऱ्यांवर उगारणार शिस्तीचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:10 PM2021-06-16T13:10:37+5:302021-06-16T13:11:07+5:30

Congress : आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्या अनुषंगाने ठाण्यातही शहर काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे.

Thane City Congress will inflict disciplinary action on the office bearers | ठाणे शहर काँग्रेस कामचुकार पदाधिकाऱ्यांवर उगारणार शिस्तीचा बडगा

ठाणे शहर काँग्रेस कामचुकार पदाधिकाऱ्यांवर उगारणार शिस्तीचा बडगा

Next

ठाणे  : आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोणातून शहर काँग्रेसने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने पक्ष वाढविण्याबरोबर, पक्ष सक्षम करतांना जे पदाधिकारी या कामात कामचुकारपणा करतील किंवा केवळ वरिष्ठांकडे हुजरेगिरी करताना ठाण्यात पक्ष बांधणीसाठी वेळ देणार नाहीत, अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती शहर काँग्रेसच्यावतीने देण्यात आली आहे.

निष्क्रीय कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाला वेळ न देणारे कार्यकर्ते, शिस्तीचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शिस्तीचा बडगा उगारला जाणार असून अशा कार्यकर्त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.

आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्या अनुषंगाने ठाण्यातही शहर काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार आता पक्ष वाढविण्यासाठी, शहराच्या दृष्टीकोणातून महत्वाचे असलेले विषय हाताळून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आता काँग्रेसने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

तसेच, प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर त्या अनुषंगाने जबाबदारी देण्यास सुरवात झाली आहे. आगामी निवडणुका आता नऊ महिन्यांवर आल्या आहेत. सध्या पक्षाचे ३ नगरसेवक जरी असले तरी त्यात जास्तीची वाढ कशी करता येईल, या अनुषंगाने सध्या व्यूव्हरचना आखली जात आहे. परंतु पक्ष वाढविण्यासाठी आणि ग्राऊंड लेव्हल काम करण्यात जे कार्यकर्ते, पदाधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे माहिती शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

पक्षाला नवसंजीवनी देताना, जे पदाधिकारी, कार्यकर्ते निष्क्रीय असतील अशांचा येत्या दोन दिवसात शोध घेतला जाणार आहे. तसेच जे पदाधिकारी पक्ष शिस्तीचे पालन करणार नाहीत, अशा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा अहवाल येत्या दोन दिवसात तयार करुन तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे. तसेच जे शहर पातळीवर काम करीत नाहीत, परंतु वरिष्ठांकडे केवळ हुजरेगिरी करुन, आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतील अशांवर देखील कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

येत्या २३ जून रोजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना एक वर्ष पूर्ण होणार आहे. या एका वर्षात शहर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी पक्ष बांधणी करतांना जम्बो कार्यकारणी तयार करुन पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, विविध आंदोलनाच्या माध्यमातून शहर काँग्रेसला उर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध कामे करुन पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, महापालिकेत चालणाऱ्या चुकीच्या पद्धतीने चालणाऱ्या कामांची पोलखोलही त्यांनी केली.

पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीकोणातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पक्षाला शिस्त लावली जावी, प्रत्येक पदाधिकाऱ्यांने मैदानात उतरुन काम करावे याच उद्देशाने हे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसारच, जे कामचुकार पदाधिकारी असतील त्यांचा अहवाल दोन दिवसात पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार आहे.
- अॅड. विक्रांत चव्हाण - शहर अध्यक्ष, काँग्रेस - ठाणे

Web Title: Thane City Congress will inflict disciplinary action on the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.