Jasprit Bumrah Flop in IPL 2026 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह IPL 2026 मध्ये एका विचित्र गोष्टींचा सामना करताना दिसतोय. स्पर्धेत पाच सामने खेळूनही बुमराहला अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी म्हणावी लागते आहे. एकेकाळी संघाला हमखास विकेट मिळवून देणारा जसप्रीत बुमराह सध्या पाच सामन्यात मिळून एकही विकेट काढू शकत नाही, ही बाब चाहत्यांना पचनी पडणे जड जात आहे. त्यामुळेच सारे आश्चर्यचकित झाले आहेत. त्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, तो विकेट्स तर घेतच नाहीये, पण प्रतिस्पर्धी संघाला धावाही खूप देताना दिसतोय. त्यामुळे बुमराहचा विचित्र फॉर्म मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनासाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. पण यामागचे नेमके कारण काय, याबाबत जाणकार बोलताना दिसत आहेत.
लौकिकाला साजेसा खेळ नाही...
आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत बुमराहने पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांविरुद्ध गोलंदाजी केली आहे. या सामन्यांमध्ये त्याने एकूण १६४ धावा दिल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.६३ राहिला आहे. सरासरी, तो प्रति षटक सुमारे ८-९ धावा देत आहे. आयपीएलसारख्या फलंदाजधार्जिण्या स्पर्धेत या धावा म्हणजे वाईट कामगिरी नाही, परंतु बुमराहसारख्या प्रमुख गोलंदाजाकडून यापेक्षा खूप जास्त चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. बुमराहची सध्याची कामगिरी त्याच्या नेहमीच्या कामगिरीच्या पूर्णपणे उलट आहे. बुमराह हा मॅचविनर गोलंदाज आहे, पण सध्या त्याला फारच संघर्ष करावा लागत आहे.
गोलंदाजी प्रभावी का ठरत नाही?
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा प्रभाव कमी होण्याची एक कारण म्हणजे फलंदाज आता बुमराहविरुद्ध पूर्वीपेक्षा अधिक आक्रमकतेने आणि आत्मविश्वासाने खेळत आहेत. पूर्वी, केवळ बुमराहचे नाव काढल्याने फलंदाज सावध व्हायचे आणि मोठे फटके मारण्याचा विचार टाळायचे. पण आता ते बिनधास्त फटके खेळतात. बुमराहला खेळताना फलंदाजांच्या दृष्टिकोनात स्पष्ट बदल दिसून येतो. त्याचा परिणाम बुमराहच्या विकेट्स घेण्याच्या क्षमतेवर दिसून येतोय. याव्यतिरिक्त, त्याच्या गोलंदाजीत एक महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहे. बुमराहचा फॉर्म ही मोठी समस्या नाही, पण तो गोलंदाजी करताना अधिकाधिक चेंडू संथ गतीने म्हणजेच 'स्लोअर वन्स' (slower ones) टाकतोय. या हंगामात एकूण गोलंदाजीपैकी सुमारे ४४% चेंडू बुमराहने स्लोअर चेंडू टाकले आहेत. त्यामुळे त्याचा सरासरी वेग ताशी सुमारे १३० किलोमीटरपर्यंत कमी झाला आहे. अशा वेळी फलंदाज या स्लोअर चेंडूंसाठी तयार असतात आणि ते सहजपणे चेंडू खेळू शकतात. जर बुमराहने वेगाने गोलंदाजी केली, तर त्याचे स्लोअर चेंडू आणखी प्रभावी ठरू शकतात.