"जी भीती होती, ती अखेर खरी ठरली"; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 15:18 IST2021-05-04T15:08:34+5:302021-05-04T15:18:29+5:30
NCP Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

"जी भीती होती, ती अखेर खरी ठरली"; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा
मुंबई - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाच राज्यांच्या निवडणुका पार (Election Result) पडल्या. याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये मिनी विधानसभा समजली जाणारी ग्राम पंचायत निवडणूक (Panchayat Election in UP) झाली. या निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच सरकारी कंपन्यांकडून (Oil PSUs) इंधनाच्या दरांत वाढ (Petrol Diesel Price) करण्यात आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचं एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. आज केंद्राने इंधन दरवाढ केल्यानंतर रोहित यांनी ट्विट केलं आहे. जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, असं सूचक विधान रोहित यांनी केलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी 2 मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये "चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय!" असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा "जी भीती होती, ती अखेर खरी ठरली" असं म्हटलं आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती. आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत दिल्लीमध्ये 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर 90.55 रुपये तर डिझेलचा दर 80.91 रुपये झाला होता. देशात निवडणुकांचा काळ असल्याने गेल्या 66 दिवसांत कच्चे तेल महागले तरीही पेट्रोल, डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Price) वाढ झाली नव्हती. मात्र, याच काळात कच्च्या तेलाच्या किंमती जेव्हा जेव्हा कोसळल्या तेव्हा चारवेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. यामुळे पेट्रोल 77 पैशांनी स्वस्त झाले होते.
चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय! pic.twitter.com/qGPEv6GDLX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2021
कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या आठवड्यात मोठी वाढ पहायला मिळाली. यामुळे कच्चे तेल गेल्या सहा आठवड्यांच्या किमतीपेक्षा जास्त वाढले होते. मात्र, शेवटच्या दिवशी डॉलर मजबूत होणे आणि ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट दिसून आली. टाळेबंदीमुळे मालवाहतूक, पर्यटन, कॅब वाहतूक याला मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या वर्षभरात डिझेलची मागणी 12 आणि पेट्रोलची मागणी सात टक्क्यांनी घटली आहे. डिझेलची मागणी 98 लाख 33 हजार आणि पेट्रोलची मागणी 20 लाख 24 हजार टनांनी घटली आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत आर्थिक वर्षात 1 कोटी 18 लाख 57 हजार टनांनी घट झाली आहे.