"मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 12:17 PM2020-12-06T12:17:24+5:302020-12-06T12:17:46+5:30

Asaduddin Owaisi : हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे.

greater hyderabad municipal corporation result aimim asaduddin owaisi targets bjp trs | "मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच"

"मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच"

googlenewsNext

नवी दिल्ली - तेलंगणामधील हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र या निकालामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे. पण तिन्ही पक्ष बहुमतापासून दूर आहेत. टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ‘ॲडव्हॉन्टेज टीआरएस’ असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएमची भूमिका महापौर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे.  

हैदराबादचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, एमआयएमच्या पाठिंब्याशिवाय टीआरएससमोर पर्याय नाही. एमआयएम केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला पाठिंबा देईल का? असा प्रश्न ओवैसींना विचारला गेला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. मात्र "मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. 

टीआरएसने तिहेरी तलाक विधेयकावर सरकारला केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवला होता. तुम्ही त्या विधेयकाविरोधात होते. अशा परिस्थितीत टीआरएस सोबत जाणं योग्य असेल का? असा प्रश्न ओवैसींना केला गेला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिलं. याच टीआरएसने एनपीआर विरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला. तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं. टीआरएस धोरण वेगळं आहे. आमचं वेगळं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न? तर त्याची अधिसूचना येऊ द्या. आम्ही पक्षात चर्चा करू आणि जो काही निर्णय होईल तो जाहीर करू असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. 

महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चार वरून 48 जागांपर्यंत झेप मारली आहे. तर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएम (AIMIM) ला 44 जागांवर यश मिळाले आहे. 

"जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव", ओवैसींचा घणाघात

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ओवैसी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव झाला" असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. 'आम्ही भाजपाशी लोकशाहीच्या मार्गाने लढू. तेलंगणाचे लोक भाजपाला राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील असा आपल्याला विश्वास आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

Web Title: greater hyderabad municipal corporation result aimim asaduddin owaisi targets bjp trs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.