"मोदीजी कांदे, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत तर..."; इंधन दरवाढीवर भाजपा प्रवक्त्याचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:10 PM2021-07-05T12:10:47+5:302021-07-05T12:14:34+5:30

PM Narendra Modi And Sarika Jain : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका प्रवक्त्यांनी मात्र या दरवाढीवर अजब विधान केलं आहे.

bjp spokesperson sarika jain says pm modi is here to make india vishwaguru not to make petrol diesel cheap | "मोदीजी कांदे, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत तर..."; इंधन दरवाढीवर भाजपा प्रवक्त्याचं अजब विधान

"मोदीजी कांदे, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत तर..."; इंधन दरवाढीवर भाजपा प्रवक्त्याचं अजब विधान

Next

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. यामुळेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका प्रवक्त्यांनी मात्र या दरवाढीवर अजब विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचं म्हटलं आहे.

दिल्ली भाजपा प्रवक्त्या सारिका जैन (Sarika Jain) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले. तसेच सारिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम 370 रद्द करून अयोध्येत राम मंदिर तयार करण्यास सुरुवात करुन असे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल असं देखील म्हटलं आहे. 

सारिका जैन यांनी "ज्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी कांदा, टोमॅटो, कांदे आणि पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आले आहेत त्यांनी दूर राहावे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले आहेत. ते अयोध्येत राम मंदिर तयार करण्यासाठी, लाखो खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि मुस्लिम बहिणींना तिहेरी तलाकातून मुक्त करण्यासाठी आले आहेत" असं आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सात वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील बर्‍याच भागात 35 विमानतळे बांधण्यासाठी, अनेक एम्स रुग्णालये बांधण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी, प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी, प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आले आहेत" असं देखील जैन यांनी म्हटलं आहे. तसेच देशातील जनतेने ही कामे पाहिली पाहिजेत आणि समजून घेतलं पाहिजे की, या विकासाशी संबंधित कामांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: bjp spokesperson sarika jain says pm modi is here to make india vishwaguru not to make petrol diesel cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.