BJP Pravin Darekar Slams Nawab Malik And Rohit Pawar Over Corona virus Remdesivir | "रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?", भाजपाचा घणाघात

"रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?", भाजपाचा घणाघात

मुंबई - "देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे?," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. नवाब मलिक यांनी ट्वीटरवर भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपावर सवाल उपस्थित केला होता. नवाब मलिक यांच्या आरोपांवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. "रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?" असा सवाल देखील दरेकरांनी विचारला आहे. 

"रेमडेसिवीर बाबत "आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट", अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचे दिसून येते. आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावे!" असं दरेकर यांनी म्हटलं आहे. प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नवाब मलिक यांनी गुजरातमध्ये रेमडेसिवीर वाटल्याचा गदारोळ करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रेमडेसिवीर कुठून चोरुन आणले? असा प्रश्न विचारला होता. माझं नवाब मलिकांना आवाहन आहे की, रोहित पवारांनी सोलापुरसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रेमडेसिवीर वाटल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन रोहित पवारांनी रेमडेसिवीर कुठून चोरुन आणलं हे विचारणार का?" असं म्हटलं आहे. 

"आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्ट ही भूमिका मलिक यांनी थांबवावी"

"आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्ट ही भूमिका मलिक यांनी थांबवावी" असा सणसणीत टोला देखील प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच जर नवाब मलिक निष्पक्ष असतील तर रोहित पवारांवर रेमडेसिवीर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का?; असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. गुजरातमध्येही रेमडेसिवीरची मोठी मागणी आहे, दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात हे इंजेक्शन मोफत देण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं आहे. दरम्यान, गुजरात भाजपा अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजपा कार्यालयातून 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित लोकांच्या नातेवाईकांना देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. परंतु जेव्हा ही लस स्टॉकमध्ये नाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालयातून ही कशी उपलब्ध झाली असा सवाल विरोधकांनी केला आहे. सूरतमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर रेमडेसिवीर इजेक्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती समोर आली होती.

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं", भाजपाचा सणसणीत टोला

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील एकंदरीत कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी देशात परिस्थिती नियंत्रणात असून, अनेक त्रुटी दाखवून दिल्या. याच दरम्यान आता भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

English summary :
BJP Pravin Darekar Slams Nawab Malik And Rohit Pawar Over Corona virus Remdesivir

Web Title: BJP Pravin Darekar Slams Nawab Malik And Rohit Pawar Over Corona virus Remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.