Ajit Pawar's warning to the BJP leaders who targetting Dhananjay munde on affaire | कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : केंद्र सरकारने जनतेच्या मागण्या लक्षात घ्याव्यात. ओबीसी जनगणना, कृषी कायद्यांवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही राज्यात कृषी कायदे लागू करणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरूनही त्यांनी विरोधकांना चांगलेच झापले आहे. 


सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. 'आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय', अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 


पुणे जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीला पवार आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती.  लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?, असा इशारा दिला. 


पंकजा मुंडे यांनी केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरदेखील पवारांनी भाष्य केले. जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा. लोकसभेतच ही मागणी झाली होती आणि ही खूप जुनी मागणी असल्याचे ते म्हणाले. 

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजांचे मत काय...
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "तो विषय आता मागे पडला आहे. तरीही त्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आता आलाच आहात तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.


"कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही अशा लहान मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. सहाजिक एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलपणे बघते. हा विषय कोणाचाही असता तरी मी त्याचं राजकीय भांडवल केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशीलपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच", असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. 

Web Title: Ajit Pawar's warning to the BJP leaders who targetting Dhananjay munde on affaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.