भोसरी : शहरात महापालिकेच्या वतीने १९ ग्रंथालयांपैकी चार बंद पडली आहेत. उर्वरित ग्रंथालयांपैकी फक्त एकच ग्रंथालय सुरू आहे. सर्व ग्रंथालयांची अवस्था बिकट आहे. सोशल मीडियाचा परिणाम हा असून, ज्येष्ठ नागरिक सोडता तरुणांनी वाचनालयाकडे पाठ फिरवली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जुन्या काळातील अस्वच्छ फर्निचर, काही वाचनालयांत कोणी फिरकत नाही, तरकाही ठिकाणी फक्त शिपायांच्या देखरेखीखाली काम चालते, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. पुस्तकांची अवस्था अनेक वाचनालयांमध्ये बिकट झाली आहे. भोसरीचे भैरवनाथ वाचनालय हे जवळजवळ ८३ वर्षे जुने आहे. तरीही शंभर वाचक या वाचनालयाला मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. शहरात दीड हजार वाचक महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयांना मिळत नाहीत. अनेक वाचनालयांमध्ये पुरस्कारप्राप्त व दर्जेदार पुस्तकेच नाहीत. साहित्य अकादमीसह विविध ख्यातनाम पुरस्कारांनी गौरविलेल्या, तसेच नामवंत साहित्यिकांचे गाजलेले साहित्य कोठेच दिसत नाही. भालचंद्र नेमाडे, नरहर कुरुंदकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडुलकर, अनिल अवचट, दुर्गा भागवत, सदानंद देशमुख, संजय पवार, सदानंद मोरे, मेघना पेठे यांच्यासारख्या लेखकांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथासह विपुल ग्रंथपरंपरा आढळून येत नाही. भालचंद्र नेमाडे यांच्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कोसला उपलब्ध होत नाही. सदानंद मोरे यांच्या तुकाराम दर्शनासह विश्वास पाटील यांच्या पांगिरा, चंद्रमुखी यांसह क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर लिहिलेले पुस्तक नसल्याचे सांगण्यात येते. ग्रंथपाल सहकार्य करीत नाहीत, असा आरोप अनेक वाचक करीत आहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचे वेड वाढले आहे. त्यांच्यामध्ये इंटरनेटची क्रेझ आहे. तरुण वाचक मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिकच वाचनालयात येतात. तरुणांची संख्या वाढावी, यासाठी ग्रंथालय अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे यांनी सांगितले.(वार्ताहर)
युवकांनी फिरवली पाठ
By admin | Updated: January 18, 2016 01:03 IST