Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:59 IST2025-05-21T16:57:51+5:302025-05-21T16:59:42+5:30

तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर, मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो' असे असे बोलून वैष्णवीला धमकी दिली होती. 

Vaishnavi Hagwane case: Is your father in need, will I feed you for free? Shashank had asked for 2 crores | Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे  १६ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

वैष्णवीच्या वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी १ ६ मेला बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तर आज माध्यमांशी बोलतांना वैष्णवी यांच्या कुटूंबियांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉरच्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुस-या दिवसा पासुन शशांक व तिचे सासु सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण केले. याबाबत माझ्या लेकीने मला फोनवर सांगितले होते. त्यावेळी मी वडील या नात्याने मुलीचा संसार टिकावा यासाठी जावई व लेकीला समज दिला. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी जावई यांची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरुन माझ्या मुलीस त्रास देण्यास सुरुवात केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेवून वैष्णवीला तिच्या सासऱ्याच्या लोकांनी  शारीरीक व मानसिक त्रास देणे चालु केले होते.

ते पुढे म्हणाले, ऑगस्ट 2023 मध्ये माझी मुलगी वैष्णवी ही गरोदर असताना ही आनंदाची बातमी शशांक यास सांगितली. त्यावेळी शशांक याने तिच्या चारित्त्यावर संशय घेवून हे बाळ माझे नाही दुस-या कोणाचेतरी असेल असे म्हणत पती शशांक व सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती.

यावेळी वैष्णवीला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलून देईन असे म्हणत  घरातुन बाहेर काढले होते. त्यानंतर वैष्णवीने 27 नोव्हेबर 2023 ला सासरच्या त्रासाला कंटाळुन औषध (रॅट पॉईझन) जेवणातुन खावुन स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता.



यानंतर आम्ही तात्काळ वैष्णवीला एम्स हॉस्पीटल, औध पुणे या ठिकाणी उपचारास अॅडमिट केले. तेथे साधारण 4 दिवस तिच्यावर उपचार चालू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात आले नाहीत. त्यानंतर थोडे दिवस माहेरी ठेवून परत वैष्णवीस सासरी पाठवून दिले होते. त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर माझे जावई शशांक हे माझ्या राहत्या घरी आले व त्यांनी माझ्याकडे 2 कोटी रुपये जमीन खरेदी करण्यासाठी आम्हाला पैसे दया अशी मागणी केली होती.

त्यावेळी पैशाची कमतरता असल्याने माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही इतरत्र कोठेतरी पर्याय बघा असे सांगितले. त्यामुळे जावई शशांक यांनी वैष्णवीला 'तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला  भीक लागली काय, मी तुला फुकट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो' असे असे बोलून वैष्णवीला धमकी दिली होती. असेही वडिलांनी सांगितले.

तत्पूर्वी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक हगवणे यांनी दरवाजा ठोठावला. पत्नी वैष्णवी हिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.  

दरम्यान, वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की, वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली. मारहाण करून तिला जाच करून तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Vaishnavi Hagwane case: Is your father in need, will I feed you for free? Shashank had asked for 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.