लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक; माय- लेकाचा मृत्यू, कासारवाडी रेल्वे स्थानकावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:04 IST2025-12-24T18:04:09+5:302025-12-24T18:04:43+5:30
रेल्वे स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्यासाठी पुल असतानाही नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत

लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक; माय- लेकाचा मृत्यू, कासारवाडी रेल्वे स्थानकावरील घटना
पिंपरी : रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने माय-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी रेल्वे स्थानकावर रविवारी (दि.२१) रात्री दीडच्या सुमारास घडली.
कविता अर्जुन चव्हाण (वय ३०) व आरव अर्जुन चव्हाण (४, दोघे रा. शिरोली, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. चव्हाण यांचे मूळ गाव अक्कलकोट असून काही वर्षांपूर्वी हे कुटुंब कामानिमित्त चाकण येथे आले. अर्जुन चव्हाण हे चाकण येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत तर, कविता या गृहिणी होत्या. चार दिवसांपूर्वी एका धार्मिक विधीसाठी हे कुटुंब मूळ गावी गेले होते. तेथून रेल्वेने परत येत असताना ते कासारवाडी रेल्वे स्थानकावर उतरले. कविता व आरव हे लोहमार्ग ओलांडत होते. त्याचवेळी रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू झाला.
रेल्वे स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्यासाठी पुल असतानाही नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत. पुलावरून जाण्याऐवजी न घाबरता थेट लोहमार्ग ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रेल्वे प्रशासन वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकताना दिसत नाहीत. धोका पत्करून अशा प्रकारे लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात घडून जीव गमवावा लागत आहे. असाच प्रकार कासारवाडीत घडला. त्यामुळे या मायलेकांना जीव गमवावा लागला आहे.